nnd20sgp05.jpg
nnd20sgp05.jpg

वाळूचोरीच्या भानगडीत पडू नका


बिलोली, (जि. नांदेड) ः वाळू तस्कर यावर अंकुश ठेवणाऱ्या तहसीलदारांची बदली झाल्यानंतर तस्करांना रान मोकळे झाल्याची जोरदार चर्चा होती. मात्र ते विधान खोटे ठरवत दहा दिवसांमध्ये वाळू तस्कर यांच्या मुसक्या आवळणाऱ्या महसूल विभागाच्या पथकाने सोमवारी (ता.१९) मध्यरात्रीनंतर मांजरा नदी पात्रातून वाळू तस्करी करणारे पाच आॅटो पकडून कारवाई करत तहसीलदारांची बदली झाली म्हणून कोणी वाळू चोरीच्या भानगडीत पडू नये, असा सूचक इशारा त्यांनी वाळू तस्करांना दिला आहे. 


महसूल शासनाच्या तिजोरीत गोळा 
वर्षभरापासून वाळूचा लिलाव न झाल्यामुळे मांजरा नदी पात्रातील वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सीमावर्ती भागातील नागणी, गंजगाव, येसगी, बोळेगाव, कार्ला आणि सगरोळी आदी भागात वाळू तस्करी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. बिलोली व कुंडलवाडी शहरात तसेच परिसरातील काही वाळू तस्करांनी महसूल विभागाच्या पथकावर पाळत ठेवून पोलिस प्रशासनाला हाताशी धरून नदीपात्रातील वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणावर केली. लॉकडाऊनच्या काळात सीमावर्ती भागात पोलिस बंदोबस्त असतानाही वाळू तस्करी करणाऱ्यांनी वाळूची अमाप लूट केली. नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये तत्कालीन तहसीलदार विक्रम राजपूत यांनी मात्र वाळू तस्करीविरुद्ध कडक धोरण स्वीकारून कोट्यवधी रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत गोळा करून घेतला. 


वाळू तस्करी पुन्हा जोमाने सुरू होईल अशी चर्चा 
निवासी नायब तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार पांडुरंग निलावार, नायब तहसीलदार अनिल परळीकर, नायब तहसीलदार आर.जी.चौव्हाण यांच्यासह मंडळाधिकारी मेहेत्रे तोटावार, तलाठी मातोळे, पवन ठकरोड यांनी त्यांना सहकार्य केले. त्यामुळे वाळू तस्करीला आळा घालण्यात प्रशासनाला यश मिळाले होते. मात्र तहसीलदार विक्रम राजपूत यांची बदली होताच वाळू तस्करी करणाऱ्या लोकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले होते. तीथे नव्याने रुजू झालेले तहसीलदार स्थानिक कुंडलवाडीचे असल्यामुळे मांजरा पात्रातील वाळू तस्करी पुन्हा जोमाने सुरू होईल अशी चर्चा रंगत होती. 


दोन मोटारसायकल जप्त 
वाळू तस्करी करणाऱ्यांचे मनसुबे धुळीला मिळवत तस्करी रोखणारे महसूल विभागाचे पथक पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत. तहसीलदार बदलले म्हणून कोणीही चोरीच्या भानगडीत पडू नये असा सूचक इशारा देत मागील आठ दहा दिवसांपासून निवासी नायब तहसीलदार ओमप्रकाश गोंड, पांडुरंग निलावार, यांच्यासह मंडळाधिकारी तलाठ्यांनी वाळू तस्करी करणाऱ्यांना सळो कि पळो करून धडक कारवाईची मोहीम हाती घेतली. दरम्यान सोमवारी मध्यरात्री मांजरा नदीपात्रातून वाळू तस्करी करणारे पाच ऑटो ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. तसेच वाळू तस्करी करणारे दोन टाटा सुमो, दोन मोटारसायकल जप्त करण्यात आले आहेत. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com