‘स्वारातीम’चे अधिष्ठाता विष्णुपुरी जलाशयात बेपत्ता

dam.jpg
dam.jpg


नवीन नांदेड ः येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भगवान जाधव (वय ५३) हे विष्णुपुरी धरणात बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी (ता. पाच) सकाळी घडली. ते धरणात पोहायला गेले होते. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते. 

डॉ. भगवान जाधव उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांना काळजी वाटायला लागली. त्यांनी चौकशी केली असता ते पोहायला गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर यासंदर्भात विद्यापीठाला कळविण्यात आले. काहींनी विष्णुपुरी धरणाकडे धाव घेतली. तेथे डॉ. जाधव यांचे वाहन, कपडे आढळले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्रकुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. महापालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी रईस भाषा व त्यांचे पथक तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी, गोदावरी जीवरक्षक दल, स्थानिक नागरिकांकडून सायंकाळी उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते. दरम्यान, डॉ. जाधव नेहमी या ठिकाणी पोहायला येत असल्याचे, त्यांना चांगले पोहता येत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. 

दोघांनी चाकूने मारून कॅमेरा, अंगठी पळवली 
नांदेड ः तरोडा नाका भागातील स्वामी विवेकानंद नगर येथील सौरभ प्रकाश नरवाडे (वय २२) हा त्याचा भाऊ आणि बहिणीसोबत विष्णुपुरीला रविवारी (ता. चार) गेले. त्या ठिकाणी बहिणीला परिक्षेसाठी सोडून दुपारी अडीच वाजता सौरभ व त्याचा भाऊ लक्ष्मण एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाजूला मैदानावर डबा खाण्यासाठी बसले. त्यानंतर फोटो काढण्यासाठी बॅगेतून कॅमेरा काढला. त्यावेळी दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी चाकूने जखमी करुन त्यांच्याकडील कॅमेरा आणि सोन्याची अंगठी असा ४८ हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत ग्रामिण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आर. जी. सांगळे करत आहेत. 

कृष्णूरला चाकूचा धाक दाखवून मोबाईल चोरीला 
उद्योजक राहुल एकनाथ हत्ते (वय ३५, रा. शिवशाहीनगर, तरोडा बुद्रुक) हे शनिवारी (ता. तीन) रात्री आठच्या सुमारास अब्बास भाई यांच्या हॉटेलवर जेवण करुन कृष्णुरच्या एमआयडीसीतील कंपनीकडे पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवरील दोघांनी त्यांना थांबवले. त्यानंतर एकाने पकडले तर दुसऱ्याने चाकूचा धाक दाखवून त्यांच्या हातातील १८ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेला. याबाबत कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार येवले पुढील तपास करत आहेत. 

दत्तनगरला घरफोडी ५५ हजाराचा ऐवज चोरी 
नांदेड शहरातील दत्तनगर भागातील दुलबा गणपती हरदुके (वय ३८, रा. समदरवाडी) हे घराला कुलुप लाऊन बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलुप तोडून घरातील ५५ हजार रुपये किंमतीची ऐवज चोरून नेला. ही घटना ता. दोन ते ता. चार आॅक्टोंबरच्या दरम्यान घडली. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नायक चाटे करत आहेत. 

६८ हजाराची घरफोडी 
धनेगावमधील तिरूपतीनगर येथील बालाजी माधव मिरासे (वय ३७, रा. चिरली) हे व्यापारी वडीलांचे निधन झाल्याने घराला कुलुप लाऊन गावी गेले. दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलुप तोडून प्रवेश केला. कपाटातील रोख आठ हजार रुपये आणि सोन्या चांदीचे दागिने असा एकूण ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना ता. १४ ते ता. २४ सष्टेंबर दरम्यान घडली. याबाबत नांदेड ग्रामिण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नायक गव्हाणकर करत आहेत. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com