रस्त्याचा परिसरच बनला मदिरालय; कुठे ते वाचा

IMG_20200809_160957.JPG
IMG_20200809_160957.JPG

धर्माबाद, (जि. नांदेड) : शहरातील उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेल्या मुख्य रस्त्यावरील परवाना देशी दारूच्या दुकानासमोरच भररस्त्यात व घराच्या आडोशाला मद्यप्राशन करण्याचे प्रमाण वाढले आहे. दारू पिणारे असभ्य वर्तन करीत असल्याने मुख्य रस्त्यावरील रहिवाशांना त्यांचा त्रास होत आहे. महिला-मुलींना असुरक्षित वाटत आहे. तळीराम रस्त्यावर गोंधळ घालीत असल्याने रहदारीस मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील सर्व देशी दारूचे दुकाने तत्काळ हटविण्याची मागणी माजी उपनगराध्यक्ष रमेशचंद्र तिवारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

दारू पिऊन असभ्य वर्तन 
शहरातील उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेल्या मुख्य रस्त्यावर मोंढा येथे बसस्थानकाजवळ बाळापूर रस्त्यावरील दोन व रेल्वे गेट नंबर १ जवळ एक असे जवळपास चार परवाना देशी दारूचे दुकाने मुख्य रस्त्यावरच गेल्या अनेक वर्षांपासून थाटून बसले आहेत. ठरवून दिलेल्या वेळेच्या अगोदरच हे दुकान भल्या सकाळीच सुरू करीत आहेत. दुकानासमोरच भररस्त्यात व घराच्या आडोशाला तळीराम दारू ढोसत आहेत. दारू पिऊन असभ्य वर्तन करीत तळीराम हैदोस घालीत असल्याने महिला व नागरिकांना त्रास होत आहे. वस्तीतील कुणी हटकले तर ते लोकांच्या अंगावर धावून येतात. 


अनेक संकटांचा सामना
नागरिक ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करीत आहेत. मद्यपींची हिंमत आता वाढली आहे. ते कुठेही रस्त्यावर घरासमोरच दारू पिऊन ग्लास, बॉटल फेकत आहेत. रस्त्यावर थुंकून काहीजण उलट्याही करीत आहेत. काही दारूडे तर रस्त्यावर कुठेही पडतात. अशा या वागणुकीमुळे महिला व पुरुषांना घरातील गॅलरीतही उभे राहता येत नाही. एकप्रकारे तळीराम लोटांगणसह गोंधळ घालत असल्याचे चित्र आहे. सदरील परिसरातील महिलांना साईबाबा मंदिर, दत्त मंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर अंबिका मंदिर व परिसरात असलेल्या शाळेत ये-जा करणाऱ्या बालकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.

दुकाने हटविण्याची मागणी
त्याबरोबरच शिवसेनेचे शहरप्रमुख अनिल कमलाकर, साईप्रसाद पेकमवार, अविनाश पिंगळे यांनीसुद्धा अनेकवेळा तक्रारी केल्या होत्या; परंतु राज्य उत्पादन शुल्क विभाग व नगरपरिषदेचे काही नगरसेवकांचा पाठबळ सदरील देशी दारूच्या दुकानदारांना मिळत असल्याचे बोलले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेली दैनंदिन व आठवडे बाजाराची मागणी पूर्ण झाली आहे. त्याच धर्तीवर गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली देशी दारूचे दुकाने हटविण्याची मागणी पूर्ण का होत नाही? असा सवाल जनता करीत आहे.

शहरातील वस्ती वाढली आहे. त्यामुळे सदरील देशी दारू दुकाने मुख्य रस्त्यावर आहेत. तळीराम रस्त्यावर व घराच्या आडोशाला दारू ढोसत आहेत. दारू पिणारे असभ्य वर्तन करीत गोंधळ घालीत आहेत. यामुळे महिलांना त्रास होत असून वाहतुकीलाही अडचण निर्माण होत आहे.
- रमेशचंद्र तिवारी, माजी उपनगराध्यक्ष, धर्माबाद.

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com