
देगलूर (जि.नांदेड) : रविवारी (ता.१६) सूर्याचा म्हैस वाहनाने मृग नक्षत्रात प्रवेश होताच तालुक्यात पावसाची रिपरिप सुरु झाली. गेल्या चार दिवसापासून संततधार सुरू असल्याने पावसाने तालुक्यात सूर्य दर्शनही झाले नाही. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ९०० मीमी आहे. ऑगस्टच्या मध्यांतरातच ६०० मिमी पाऊस झाला असल्याने नदी-नालेही तुडूंब भरली आहेत. पिण्याचे पाणी व जनावरांच्या वैरणाचा प्रश्न मिटला असला तरी हाताशी आलेले मूग उडीद मात्र हातचे गेले आहे. मुगाला तर कोंबे फुटु लागलेत, उडदाचे फूल व चट्टा पूर्ण गळून गेले आहे.
सोयाबीन व कापसालाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आधीच कोरोनाच्या चक्रव्यूहात सापडलेला शेतकरी या संकटाने हवालदिल झाला आहे. मुग पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतीची आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी सोमवारी (ता.१७) रोजी पाहणी करून यंत्रणेला पंचनामा करण्याचे आदेश दिलेले आहेत. अद्याप तरी शासनस्तरावरून या नुकसानी संदर्भात कोणतेच आदेश प्राप्त नसल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे.
सर्वाधिक पाऊस देगलूर मंडळात...
या आठवड्यात खानापूर मंडळात ५४८ मीमी, शहापूर ४९९ मीमी, मरखेल ४८५ मीमी, हनेगाव मंडळात ६७३ मीमी, माळेगाव ६९९ मीमी, तर देगलूर मंडळात ७१२ मीमी, ईतका सर्वाधिक पाऊस झाला असून लेंडी नदीलाही बऱ्यापैकी पाणी आले आहे. तर शहराला पाणीपुरवठा करणारा करडखेड मध्यम प्रकल्प केव्हाच ओव्हर-फ्लो झाला आहे.
पंचनामा करण्याचे आदेश...
देगलूर गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नदी नाले तुडुंब भरले असून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. उडीद हातचे गेल्यात जमा आहे. नुकसानग्रस्त शेतीची पाहणी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांनी सोमवार (ता.१७) रोजी करून यंत्रणेला पंचनामा करण्याचे आदेशही दिले आहेत.
पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू...
राज्य महामार्गावर असलेल्या वडगाव (ता. हिमायतनगर) येथील शेतकऱ्याने रविवारी (ता. १६) दिवसभर झालेल्या पावसामुळे सायंकाळी उशिरापर्यंत बसस्थानकात राहून रात्र काढली. सकाळी उठून घरी जाण्यासाठी निघाला असता पाणी थोडे असल्याचे पाहून पाण्यातून मार्ग काढीत असताना तोल गेल्यामुळे तो वाहून गेल्याची घटना सोमवारी (ता. १७) सकाळी घडली. यावेळी भोई यांना पाचारण करून सदरील शेतकऱ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. एका वर्षापूर्वी या पुलावरील रस्त्याचे काम करण्यात आले होते. सदरील रस्ता पावसाने उखडून गेला असल्यामुळे ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून जावे लागत आहे.
संपादन : सुस्मिता वडतिले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.