शिक्षक संघटनांपुढे जिल्हाधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकारी नतमस्तक, आदेश काढून झाले मोकळे

File photo
File photo
Updated on

नांदेड ः जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गुरुवारपासून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी लॉकडाउन लावले. परिणामी, यामध्ये हातावर पोट असलेल्यांसोबतच विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याचे कुणालाच काही देणे-घेणे नाही. लॉकडाउनची संधी साधून शिक्षकसंघटनाही पुढे सरसावल्या असून, त्यांचा दबावाला नतमस्तक होवून शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी यांनी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहू नये असे आदेश गुरुवारी (ता.२५) काढून मोकळे झाले आहेत.

23 एप्रिल पासून बारावीची तर 29 एप्रिलपासून दहावीची लेखी परीक्षा सुरु होत आहे. शाळा बंद केल्याने ऐन परिक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांच्या तणावात वाढ झाली आहे. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामुख्याने शिक्षक संघटनांचे काम असते. तेही आपण ज्या शाळेत आहोत, तेथील कर्तव्य इमानेइतबारे पार पाडून उर्वरीत वेळेत संघटनेचे काम करावे असे अपेक्षित आहे. मात्र, होते उलटेच. शाळेमध्ये स्वाक्षरी केली की, आमचे काम झाले असा समज काही शिक्षक संघटनांतील पदाधिकारी व सदस्यांमध्ये झालेला आहे. परिणामी, याचा विद्यार्थ्यांच्या किंबहुना शाळेच्या गुणवत्तेवरही परिणाम होताना दिसत आहे. 

दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण कमी व्हायला लागले. त्यामुळे शासनाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २० नोव्हेंबर २०२१ रोजी आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यात आल्या. पुन्हा शासनाने सहावी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र दोन महिन्यानंतरच कोरोनाचे रुग्ण आणखी वाढू लागले. त्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या. आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा दोन महिने तर सहावी ते आठवीपर्यंतच्या शाळा केवळ २० दिवस सुरु राहिल्या. 

बाजारपेठ सुरु, शाळा बंद
लॉकडाउन काळामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी सात ते दुपारी १२ वाजेपर्यंत बाजारपेठ सुरु ठेवली आहे. यावेळी कोरोना नसतो का? असा प्रश्न करत शाळाच का बंद ठेवल्यात, अशा संतप्त प्रतिक्रिया पालकांमधून उमटत आहेत. वास्तविक पाहता शाळांतील व्यवस्था ही बाजारपेठेपेक्षा कितीतरी पटीने सुरक्षित असते. परंतु, जिल्हा प्रशासनाला किंबहुना शासनाला विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानच करावयाचे असेलतर त्यापुढे काहीच बोलू शकत नाही.

प्रामाणिक शिक्षकांवर अन्याय
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून असंख्य प्रामाणिक शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जावून, गल्लीबोळांमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करत आहेत. परंतु, हे शिक्षक संघटनांशी संबंधित नसल्याने त्यांच्या प्रामाणिक कार्यावर टिकाटिपणी केली जात आहे. शिक्षणाधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांनीतरी शिक्षक संघटनांच्या दबावाला बळी न पडता सकाळी सात ते दुपारी १२ या वेळेत शाळा सुरु ठेवून सर्व शिक्षकांना शाळेत येणे बंधनकारक करावे, अशी अपेक्षाही काही शिक्षकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली आहे.
 
विनाअनुदानित शाळांवरील शिक्षकांची उपासमार
कोरोनाच्या संसर्गामुळे पुन्हा शाळा बंद केल्या असून शिक्षकांनाही शाळेत येण्यास बंदी केली आहे. त्यामुळे विनाअनुदानित शाळांवरील शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आमच्या समस्या जाणून घेवून निर्णय बदलण्याची मागणी विनाअनुदानित शाळांवरील शिक्षक करत आहेत.

 

शिक्षक संघटनांच्या दबावामुळेच जिल्हा प्रशासनाला शाळा बंद कराव्या लागल्या. परिणामी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे किती नुकसान होणार आहे, हे नियमित पगार सुरु असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना काय माहित?
- शिल्पा वसंत गोराडे (पालक)

कोरोनाला खरोखरच हरवायचे असेलतर कडक नियमावली करून त्याची कठोर अमलबजावणी करावी. त्यासाठी लॉकडाउन हा पर्याय नाही. कारण हातावर पोट असणाऱ्यांचे खूप हाल होत आहेत.
- दादासाहेब नरवाडे (हमाल)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com