नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांना कामातील कामचुकारपणा भोवणार

प्रमोद चौधरी
Saturday, 19 December 2020

मुखेड तालुक्यातील चांडोळा (जि. नांदेड) येते विद्यार्थ्यांच्या घरी जावून शैक्षणिक प्रगतीविषयी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी माहिती घेतली. 

नांदेड :  अनलॉकमध्ये शाळा सुरु झालेल्या आहेत. परंतु, विद्यार्थ्यांविना या शाळा भरत असून, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जावून त्यांच्या अभ्यासाची प्रगती तपासणे ही अट आहे. मात्र, बहुतांश शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जावून भेटी देत नसल्याचे दिसून येत आहे. यापुढील काळात शिक्षकांनी गृहभेटीमध्ये निष्काळजीपणा केल्यास त्यांना प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी ताकीद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर या गुरुवारी (ता.१७) मुखेड तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. दरम्यान त्यांनी तालुक्यातील चांडोळा येथे विद्यार्थ्यांच्या घरी भेट दिली. त्यांनी आपल्या शाळेतील शिक्षक भेटीस आले होते काय, अशी विचारणा केली. त्यावर विद्यार्थ्यांकडून नकारात्मक उत्तरे आली. त्यामुळे संतप्त होवून श्रीमती ठाकूर यांनी चांडोळा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या वेतनवाढी रोखण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. त्यामध्ये लता तोटरे, वसंत शिंदे, व्यंकट सोमवारे आणि आत्माराम खडगावे या शिक्षकांचा समावेश आहे. याप्रसंगी त्यांच्यासोबत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पांडुरंग भालके यांच्यासह इतर विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. 

हेही वाचा - परभणी : ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी घराघरात वाढतेय दूश्मनी- सेलू तालूक्यात ६७ ग्रामपंचायतीच्या निवडणूका

गृहभेटीनंतर श्रीमती ठाकूर यांनी पंचायत समिती कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांची बैठत धेवून विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना वेळेवर कामे पूर्ण करण्याची ताकीद दिली. तसेच कोरोनामुळे विद्यार्थी जरी शाळेमध्ये येत नसतील तरी त्यांच्या घरी जावून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधली पाहिजे. यात कोणी कामचुकारपणा करत असेल त्यांना प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबीच वर्षा ठाकूर यांनी दिली आहे.

हे देखील वाचाच - Success Story : नांदेड : बळेगाव येथील नैसर्गिक गुळाला महाराष्ट्रसह शेजारील राज्यामध्ये मागणी
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी शाळेत नाहीच
शासनाच्या आदेशानुसार नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. परंतु, बहुतांश पालकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविणेच पसंत केले आहे. असे असले तरी पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण दिले जाते आहे. हे शिक्षण देताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जावून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासणे आवश्यर आहे. परंतु, ही तपासणी होत नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या दौऱ्यात स्पष्ट झाले आहे.

काटेकोर अमलबजावणी करावी
‘‘प्रगत शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत प्रत्‍येक शाळेत शैक्षणिक गुणवत्‍ता वाढ अभियान राबविण्‍यात येत असते. त्‍याची काटेकोर अंमलबजावणी प्रत्येक शाळेमध्ये  होणे आवश्‍यक आहे.’’
- वर्षा ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Educators In Nanded District Will Be Overwhelmed With Work Nanded News