
Urinary tract infection : महिलांमध्ये मूत्र संसर्गाची समस्या; नोकरी करणाऱ्या महिलांना अधिक त्रास
नांदेड : वाढत्या तापमानामुळे आरोग्याविषयी विविध समस्या डोके वर काढत आहेत. अशातच महिलांमध्ये मूत्र संसर्गाची (युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन- यूटीआय) वाढत असून, सुमारे ७० टक्के महिलांना त्रास जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे.
गृहिणींसोबतच नोकरदार, पोलिस विभागात कार्यरत महिलांमध्ये ‘यूटीआय’चा त्रास अधिक प्रमाणात आहे. कामाचे अधिक तास, पाणी कमी पिणे, कामानिमित्त कुठेही जावे लागणे, तेथे स्वच्छतागृहाची सोय नसणे, असल्यास ते अस्वच्छ असणे आदींमुळे महिला पोलिसांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
‘यूटीआय’ची समस्या उद्भवलेल्या शहरातील अशा काही महिला पोलिसांना औषधोपचारही देण्यात आल्याचे काही स्त्रीरोगतज्ज्ञांनी सांगितले. महिला पोलिसांच्या कामाच्या वेळा निश्चित नसतात. कामानिमित्त त्यांना कुठेही जावे लागते.
वाहतूक शाखेत कार्यरत असल्यास तासन्तास चौक किंवा सिग्नलवर उभे राहावे लागते. त्यामुळे बराच वेळ त्यांना स्वच्छतागृहात जाता येत नाही. त्यामुळे त्यांना मूत्र संसर्ग होतो, असे तज्ज्ञ सांगतात. अन्य काही क्षेत्रांतील नोकरदार महिलांनाही असा त्रास होतो.
विविध कंपन्यांचे सॅनिटरी नॅपकिन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ते वापरणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. मात्र, काही नॅपकिनच्या किमती अधिक असल्याने प्रत्येक महिला बजेटमध्ये असणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनची निवड करतात. काही कंपन्यांच्या सॅनिटरी नॅपकिनमुळे संसर्ग होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जाते, असेही तज्ज्ञ सांगतात.
दिवसभरात तीन लिटर पाणी गरजेचे मूत्र संसर्ग झाल्याने मूत्राशयात जिवाणू जमा होतात. यापासून बचावासाठी दिवसभरात किमान तीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. जेणेकरून मूत्राद्वारे जिवाणू निघून जातील.
आंबट फळे सेवनावर भर द्यावा. संत्री, लिंबू यात सायट्रिक अॅसिड असते. त्यामुळे शरीरात असणाऱ्या घातक जिवाणूंचा नायनाट होतो. युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी आंबट फळे खाणे फायदेशीर आहे, असे तज्ज्ञ सांगतात.
सध्या सर्वत्र उन्हाचा पारा वाढत आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय महिलांनी घराबाहेर पडू नये. श्रमाची कामे शक्यतो सकाळीच करावीत. नोकरीला जाणाऱ्या महिलांनी घराबाहेर पडताना भरपूर पाणी प्यावे. स्कार्फ, गॉगल, सनकोट आणि हॅण्डग्लोजचा वापर करावा. योग्य काळजी घेतल्यास मूत्र संसर्गापासून बचाव होईल.
- डॉ. कल्पना खल्लाळ, स्त्रीरोगतज्ज्ञ, नांदेड
‘यूटीआय’ची लक्षणे
मूत्रविसर्जनादरम्यान जळजळ होणे
सतत किंवा तातडीने मूत्रविर्सनाला जावेसे वाटणे
लघवीचा रंग गडद होणे
कंबर, ओटीपोटात दुखणे
कोणती काळजी घ्यावी?
उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत
घट्ट कपडे शक्यतो टाळावेत
भरपूर पाणी प्यावे
मूत्रविसर्जनाला जाणे टाळू नये