नांदेड जिल्ह्यातील तामसा येथे चार दिवसात आठ कोरोना बाधित रुग्ण सापडले

शशिकांत धानोरकर
Sunday, 26 July 2020

या महामारीचा फैलाव शहरात झपाट्याने वाढतो का ? याची धास्ती वाढली आहे. येथील वार्ड क्रमांक एक मधील कन्टेन्टमेंट झोनमध्ये बाधितांची संख्या पाच झाली असून शहरातील एका बँकेतील कर्मचारी पत्नीसह प्रभावित आहे.

तामसा (ता. हदगाव, जिल्हा नांदेड) : तामसा येथे कोरोना बाधिताच्या  संख्येत झपाट्याने वाढ होत असून चार दिवसात आठ रुग्ण शहरात आढळल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. रविवारी (ता. २६) शहरातील तीन भागात चार रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले असून यामुळे या महामारीचा फैलाव शहरात झपाट्याने वाढतो का ? याची धास्ती वाढली आहे. येथील वार्ड क्रमांक एक मधील कन्टेन्टमेंट झोनमध्ये बाधितांची संख्या पाच झाली असून शहरातील एका बँकेतील कर्मचारी पत्नीसह प्रभावित आहे. तर वार्ड क्रमांक सहामधील एक जण बाधित असल्याचे रविवारी स्पष्ट झाले यामुळे शहरातील कंटेंटमेंट झोनच्या संख्येतही वाढ होणार, हे स्पष्ट आहे. 

रविवारी ज्यांना  कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले त्यांच्यामुळे शहराच्या विविध भागात व ग्रामीण भागातील नागरिक संपर्कात येण्याची शक्यता असल्यामुळे भिती वाढली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासन देखील हादरले असून प्रतिबंधात्मक उपायोजना आखण्यासाठी प्रशासनाची त्रेधातिरपीट उडत आहे. रविवारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपक कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे, माधव नारेवाड यांच्यासह आरोग्य पथक व ग्रामपंचायतचे कर्मचारी वार्ड क्रमांक सहामधील कोरोना बाधित रुग्णाच्या घर परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना आखून बाधिताच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेत होते. बँकेतील बाधितांच्या संपर्कात आलेल्या बँकेच्या ग्राहकांची नावे निश्चिती सोमवारी (ता. २७) करून बँकबाबतीत प्रतिबंधात्मक उपायोजना आखल्या जाणार आहेत. दरम्यान कन्टेन्टमेंट भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी व इतर जीवनावश्यक सुविधा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. 

हेही वाचा -  धक्कादायक : शेवटसुद्धा चांगला नाही, यांच्या गलथान कारभारामुळे करावा लागला ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार 

रविवारी रुग्णसंख्या दुप्पट होण्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहणे आवश्यक

प्रशासनाचे नियंत्रण कमी होत असल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रातून  बाहेर जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो. प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा    अभाव स्पष्ट होत असून बाहेरगावहून येणारे अधिकारी आपल्या कर्तव्याबाबत कमालीची बेपर्वाई दाखवत असल्याबद्दल नाराजीचा सूर ऐकावयास मिळत आहे. रविवारी रुग्णसंख्या दुप्पट होण्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहणे आवश्यक असून या महामारीचा फैलाव रोखण्यासाठी कडक पावले उचलणे आवश्यक झाले आहे. पण या महामहारीशी संबंधित शासनाच्या विविध विभागांमध्ये जबाबदारी इतरांवर ढकलण्याचे प्रकार ऐकावयास मिळत आहेत. पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी. कर्मचारी यांनी उपाययोजना आखण्यात बाबत प्रयत्न चालू केले आहेत. 

आपल्या कुटुंबासह घरी सुरक्षित राहावे 

रविवारी बाधित संख्या वाढल्यामुळे एका खाजगी डॉक्टरला पुन्हा स्वॅब नमुन्यासाठी आरोग्य विभागाकडून सूचना झाली आहे. तसेच ज्या तीन खाजगी डॉक्टरांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह आले आहेत त्यांना व त्यांच्या  शेजारी औषधी दुकानांना सात दिवस कोरंटाइन राहण्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.  नागरिकांनी तामसा येथे बाजारपेठेत गर्दी करण्याचे टाळावे. तसेच व्यापाऱ्यांनी स्वतःच्या दुकानात प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. अन्यथा संबंधितांविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे व ग्रामपंचायतकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक काम असेल तरच घराच्या बाहेर मास्क बांधून पडावे व आपल्या कुटुंबासह घरी सुरक्षित राहावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिपक कदम व वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास बोंदरवाड यांनी केले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight corona-infected patients were found in four days at Tamsa in Nanded district