Video : सैनिकाचा उत्साह, उमेद देउन गेली अनेकांना मदत, वाचा अशीही देशभक्ती  

Nanded Photo
Nanded Photo

नांदेड : कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे (ता.२२) मार्चला लॉकडाउनमध्ये नांदेडचा एक सैनिक हैदराबाद येथून घरी परतला. देशसेवा झाली आता घरी आल्यावर इथे मिळणारा निवांतपणा त्याने आपल्या भागातील गरजूंसाठी मदतरुपी कार्यातून घालविला. त्याच्या मदतीच्या हाकेला अनेक मित्रांची साथ मिळाली अन् पाहता पाहता त्याने उचललेला खारीचा वाटा अनेकांच्या मनात घर करुन राहीला. आता हाच सैनिक पुन्हा देशसेवेसाठी जाताना मदत मिळालेल्या अनेकांच्या डोळ्याच्या कडा पानावल्या. ६८ दिवसांचे समाज कार्य पूर्ण करुन प्रविण पुन्हा नव्या दमाने देशसेवेसाठी लवकरच सैन्यदलात रुजु होणार आहे.   

प्रवीण देवडे हा सैनिक हैदराबादहून सुट्टीवर नांदेडला घरी आला होता. मनात असूनदेखील त्याला लॉकडाउनमुळे जाता येत नव्हते. दरम्यान, अनेक रोजमजुरदार, परप्रांतीय असोत किंवा तृतीयपंथी, झोपडपट्टीतील तळहातावर पोट असणाऱ्या जनतेचे लॉकडाउनमध्ये प्रचंड हाल सुरु झाल्याचे त्या सैनिकाच्या नजरेस बघवत नव्हते. त्यांच्यातील देशभक्त सैनिक त्याला स्वस्थ बसू देत नव्हता.

त्याने थेट बँकेतील स्वतःच्या जमा पुंजीलाच हात घालण्याचे ठरविले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्याशी बोलुन मदत करण्यासाठीची इच्छा व्यक्त केली. त्यांनीदेखील प्रवीणच्या शब्दास लगेच होकार दिला आणि ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही. ज्यांना शासनाची मदत अद्याप पोहचेली नाही. जे मजूर स्थलांतर करत आहेत, अशा कुटुंबियांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. शेकडो कुटुंबियांचे हाल होत आहेत. आपण एकटे कसे पुरणार सर्वांना म्हणून त्याने शाळेतील मित्रांना सोशल मीडियातून मदतीसाठी आवाहन केले. शाळा - महाविद्यालयीन शिक्षणानंतर गेल्या १५ वर्षापासून अनेकांच्या गाठीभेटी नसलेल्या असंख्य मित्रांनी त्याच्या आवाहनास जमेल त्या पद्धतीने प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. 

दहा सैनिक मित्रांचा ग्रुप मदतीला 
शेकडो गरजवंतांपर्यंत पोहचायचे कसे हे प्रवीणसमोर सर्वात मोठे आव्हान असताना त्याच्याशी इतर नऊ सैनिक जोडली गेली. तेव्हा हा दहा जणांचा ग्रुप झाला आणि बघता बघता या ग्रुपने अडीच हजार रेशन किट तयार करुन त्या योग्य व गरजवंत कुटुंबियांच्या घरापर्यंत पोहचवल्या. साडेबारा हजार गरजवंतांना तयार जेवण पुरविण्यासाठी टिमने मोलाचे कार्य केल्याने काही प्रमाणात का होईना जिल्हा प्रशासनाच्या डोक्याचा ताण हलका झाला. दरम्यान प्रवीण देवडे हा एकमेव व्यक्ती सर्वांना मदत करत होता असे नव्हे तर अनेक लोकप्रतिनिधी, स्वंयसेवी संस्था, संघटना आपापल्यापरीने मदतकार्य करत होत्या. परंतु, प्रवीणने कोणत्याही पक्षाचा आधार न घेता एक व्यक्ती म्हणून अतिशय पारदर्शक आणि धैर्याने कामात झोकुन दिले होते. 

भाजीपाला, पाणी, मास्कचे अनेकांना वाटप
प्रवाशांनादेखील तयार जेवण, पाणी व मास्कपर्यंत सर्व सुविधा पुरविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. दरम्यान त्याच्या टिमने ५५ क्विंटल फळांचे वाटप केले. शिवाय गरीब वस्तीमधील जनतेला आठ दिवस पुरेल इतक्या भाजीपाल्याच्या दोन हजार किट तयार करुन त्याचे वाटप केले. हे करताना त्याने कोविड योद्धा म्हणून रस्त्यावर कार्य करणारे पोलिस प्रशासन, सफाई कामगार, डॉक्टर्स यांनादेखील जमेल त्या पद्धतीने पाणी बॉटल्स, बिस्कीट व फळांचे वाटप केले. यासाठी प्रवीणला सुमीत मोरे, जयेश भरणे, अर्जुन नागेश्वर, स्वप्नील मेरगु, मयुर बोकण, नरसिंग मुरकुटे, विनय मंतुरी, प्रदीप टाक आणि संदेश पांडे या नऊ मित्रांची साथ लाभली. प्रवीणच्या या कार्याचा खासदार हेमंत पाटील व जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी कौतुक करुन सत्कार केला. 


कार्य नेहमीच सुरु ठेवणार 
देशातील प्रत्येक नागरिक लॉकडाउनमुळे खुप वाईट अवस्थेत जिवन जगत आहे. शासनाचे मदतीचे हात जिथे पोहचने बाकी आहे अशा ठिकाणी वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना अन्नधान्य व भाजीपाला किटचे वाटप केले आहे. ६८ दिवसानंतर हे कार्य प्रत्यक्ष थांबवत असलो तरी, कुठेही असलो तरी जमेल त्या पद्धतीने अदृष्य स्वरुपात हे कार्य नेहमीच सुरु ठेवणार आहे. यासाठी मला मित्र परिवाराची मोलाची मदत झाली, त्यांच्यामुळेच इतके मोठे कार्य करण्याचे धैर्य मिळाले.
- प्रवीण देवडे, सैनिक.   
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com