स्वातंत्र्याची ७४ वर्षे लोटली तरी किनवट तालुक्यातील वसंतवाडीला रस्ता नाही

स्मिता कानिंदे
Thursday, 10 September 2020

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही झाला नाही, तो २३ जानेवारी २०२१ पर्यंत करावा, अन्यथा नाईलाजास्तव समस्त गावकरी रस्त्याच्या मागणीसाठी २३ जानेवारी २०२१ पासून गुरं - ढोरं, शेळ्या - मेंढ्या, गाडी - बैलासह, गावातील सर्व महिला पुरुष, लहान थोरासह सर्वजण सनदशीर मार्गाने मिडियाच्या साक्षीने उपोषणाचा मार्ग अवलंबनार असल्याचे निवेदन वसंतवाडी येथील समस्त नागरिकांनी बुधवारी (नऊ) सहायक जिल्हाधिकारी, किनवट यांना दिले आहे. 

गोकुंदा (जिल्हा नांदेड ) : चिखलातून आजारी व्यक्तीला बाजेवरून कधी बैलगाडीने दवाखाण्यात नेणे, महिलांची रस्त्यातच होणारी प्रसुती, वेळेवर उपचार न मिळाल्याने निधन, या सर्व बाबींना कारणीभूत असलेला पक्का रस्ता स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही झाला नाही, तो २३ जानेवारी २०२१ पर्यंत करावा, अन्यथा नाईलाजास्तव समस्त गावकरी रस्त्याच्या मागणीसाठी २३ जानेवारी २०२१ पासून गुरं - ढोरं, शेळ्या - मेंढ्या, गाडी - बैलासह, गावातील सर्व महिला पुरुष, लहान थोरासह सर्वजण सनदशीर मार्गाने मिडियाच्या साक्षीने उपोषणाचा मार्ग अवलंबनार असल्याचे निवेदन वसंतवाडी येथील समस्त नागरिकांनी बुधवारी (नऊ) सहायक जिल्हाधिकारी, किनवट यांना दिले आहे. 

किनवट तालुक्यातील गट ग्राम पंचायत धामनधरीत येणारं वसंतवाडी हे अतिमागास , अतिदुर्गम व आदिवासी बहूल गाव.  जंगलाने व्यापलेल्या या गावाची लोकसंख्या अंदाजे ६०० च्या आसपास असुन सर्वजन मजूरी व शेती करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. किनवट शहरापासून या गावाचे अंतर साधारण ३० कि.मी. असुन स्वातंत्र्याची ७४ वर्षे लोटली तरी या आदिवासी बहूल गावाला अद्यापही मजबुत रस्ता उपलब्ध झाला नाही. वसंतवाडी, वडोली परिसरातील अन्य गावातील लोकांना किनवट येण्यासाठी वडोली मार्गे जावे लागते. वसंतवाडी ते वडोली हे सुमारे ६ कि.मी. अंतर. परंतु येथे कच्चा रस्ता सुद्धा  नसल्यामुळे या गावातील नागरीकांना चिखलातून वाट तयार करून वडोलीला यावे लागते. त्यानंतर किनवटला जाणे सोयीचे होते. 

वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांना वाटेतच मरण पत्करावे लागले.

मागील सुमारे ७४ वर्षापासून या गावाला जाण्यासाठी शासन अथवा प्रशासनाने रस्ता तयार करून दिला नसल्यामुळे येथील आदिवासी बांधवांना पायी चिखल तुडवत वाट काढावी लागत आहे. रस्त्या अभावी वसंतवाडी गावात कोणतेही चारचाकी वाहन येत नाही, तर दुचाकी धारकांना मोठ्या मुश्कीलीने पाणी, खड्डे व चिखलातून ढकलत मार्गक्रमण करावे लागते. कित्येक वेळा आजारी व्यक्तीला बाजेवरूनच दवाखाण्यात नेण्याची कसरत करावी लागते. यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांना वाटेतच मरण पत्करावे लागले. तर कित्येक महिला वाटेतच प्रसुत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकदा अपघाताचे प्रसंग उदभवत आहेत.  

पक्का रस्ता करून देण्यास शासन-प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ

वसंतवाडी ते वडोली पर्यंत अंदाजे  ६ कि.मी. अंतराच्या रस्त्यासाठी येथील नागरीकांना यापूर्वी प्रशासनाकडे अनेकवेळा लेखी निवेदने सादर केली मात्र याचा काही उपयोग झाला नाही. वसंतवाडी हे गाव मागाम, दुर्गग तसेच आदिवासी बहूल असल्यामुळेच या गावाला पक्का रस्ता करून देण्यास शासन-प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे की काय ? अशी शंका उपस्थित केल्या जात आहे. म्हणून आगामी उन्हाळ्यापर्यंत वसंतवाडी ते वडोली ६ कि. मी. अंतराचा पक्का रस्ता तयार करून द्यावा, अन्यथा नाईलाजास्तव समस्त गावकरी रस्त्याच्या मागणीसाठी २३ जानेवारी २०२१ पासून गुरं - ढोरं, शेळ्या - मेंढ्या, गाडी - बैलासह, गावातील सर्व महिला पुरुष, लहान थोरासह सर्वजण सनदशीर मार्गाने मिडियाच्या साक्षीने उपोषणाचा मार्ग अवलंबनार असल्याचे निवेदन आदिवासी विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष विकास कुडमते यांच्या नेतृत्वात दिगांबर मडावी, बळीराम मडावी, आशीष आर्के, करण मडावी आदिंनी समस्त गावकऱ्यांच्या स्वाक्षरीने सहायक जिल्हाधिकारी यांना बुधवारी (ता. नऊ ) दिले आहे. उप विभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार मोहम्मद रफीक यांनी हे निवेदन स्विकारले.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Even after 74 years of independence, there is no road to Vasantwadi in Kinwat taluka nanded news