जीवनशैलीच्या बदलासह रुढी-परंपरेलाही छेद, कसा? 

प्रमोद चौधरी
Friday, 2 October 2020

कोरोना विषाणुने संपूर्ण जगाला हैराण केले आहे. कोरोनाने जीवनशैलीच्या बदलासह समाजातील रुढी-परंपरेलाही छेद दिला आहे.

नांदेड : समाजातील रुढी-परंपरा काळानुसार बदलाव्यात म्हणून अनेक संघटना समाजामध्ये जनजागृती करत होते. परंतु, त्यांना यश आलेले नाही. मात्र, कोरोना विषाणुने सहा महिन्यातच ही जीवनशैली अक्षरशः बदलवून टाकली आहे. अर्थातच जीवनशैलीसोबतच कित्येक वर्षांपासून समाजात रुढ असलेल्या परंपरेलाही कोरोनाने छेद दिला आहे.  

संपूर्ण जगासह देशाला विळख्यात घेतलेल्या कोरोना विषाणुने देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आणत मानवाची जीवनशैलीच बदलून टाकली आहे. मोठ्या थाटामाटात होणारे विवाह सोहळे मोजक्यांच्याच उपस्थितीत होऊ लागले. एवढेच नव्हे तर मृत्यूनंतरचे कर्मकांडही करता येत नसल्याने कोरोनाने थेट रूढी-परंपरेलाही छेद दिला आहे. डोळ्याने न दिसणाऱ्या एका विषाणूने घडवलेला बदल आता प्रत्येकाच्या अंगवळणी पडत आहे.

हेही वाचा - नांदेड : दाळीचे दर गगणाला, भाजीपाल्याचे दर कडाडले, अनेक भाज्या गायब

सण-उत्सवांवरही आले निर्बंध
सहा महिन्यापूर्वी देशात शिरकाव केलेल्या कोरोना विषाणूने ऐतिहासिक बदल करीत सुरळीत चालललेल्या माणसाच्या आयुष्यालाही मोठे वळण दिले आहे. कोरोनाचा होणारा संसर्ग मोठ्या वेगाने पसरत असल्याने उपाययोजना करताना शासनाच्या नाकीनऊ येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा मुख्य पर्याय असल्याने गर्दी टाळण्यासाठी इतिहासात पहिल्यांदा बस, रेल्वे, विमानाची चाके थांबली होती.  मोठमोठे उत्सव, सण, विवाह सोहळे शासनाला रद्द करावे लागल्याने नेहमीच गर्दीत हरवून गेलेला माणूस सहा महिन्यांपासून एकाकी पडल्याचे जाणवत होते. प्रत्येक धर्मातील अतिमहत्त्वाचे सण, सार्वजनिक उत्सव घरीच साजरे होत आहेत.

हेही वाचलेच पाहिजे - Video - नांदेडला काँग्रेसचा प्रतीकात्मक बैलगाडी लाँगमार्च

जेवणाची चव घरच्याच भाज्यांवर भागवावी लागते
हजारोंच्या उपस्थितीत होणाऱ्या लग्नसोहळ्यांना बोटावर मोजता येतील एवढ्यांचीच उपस्थितीत बघायला मिळत आहे. यामुळे खर्चाची बचत होत असली तरी यावर अवलंबून असलेल्या मंडप, साऊंड, केटरिंग, फोटोग्राफर, आचारी, ब्युटीपार्लर, डीजे यासारख्या व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. हॉटेलच्या चटकदार जेवणाची चव आता घरच्या भाज्यांवरच भागवावी लागत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी जिवलगांचे अलिंगनही विस्मरणात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे, तर अनेक धर्मात पिढ्यान पिढ्या चालत आलेले मृत्यूनंतरचे कर्मकांडही कोरोनामुळे बंद झाले आहे. ना पिंडदान, ना दशक्रिया विधी, ना तेरवा, ना वर्षश्राद्ध यामुळे थेट परंपरेलाच छेद बसत असल्याने नागरिकांचाही नाइलाज झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Everyone Is Used To The Change Made By Corona Nanded News