मुखेड तालुक्यात अतिवृष्टीने थैमान, पंचनामे करून भरपाई द्यावी- माजी आ. बेटमोगरेकर

प्रल्हाद कांबळे
Thursday, 17 September 2020

सुमारे 30 हजा हेक्टरवरील सोयाबीन, ज्वारी, उडीद, सूर्यफूलाचे पीक नष्ट झाले. होनवडज, चांडोळा, धामणगाव, बेटमोगरा, उच्चा, माऊली व सलगरासह अनेक गावातील शेतीचे  नुकसान झाले असून अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.

मुखेड (जिल्हा नांदेड) :  उत्तरा नक्षत्रात मागील दोन दिवसांत  झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील अनेक गावातील शेतीचे व शहरासह ग्रामीण भागातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे 30 हजा हेक्टरवरील सोयाबीन, ज्वारी, उडीद, सूर्यफूलाचे पीक नष्ट झाले. होनवडज, चांडोळा, धामणगाव, बेटमोगरा, उच्चा, माऊली व सलगरासह अनेक गावातील शेतीचे  नुकसान झाले असून अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.

त्यामुळे प्रशासनाने तातडीने या नुकसानग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे करून अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह तहसीलदार व जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन देवून केली आहे.

अंदाजे 30 हजार हेक्टरवरील सोयाबीन, ज्वारी, उडीद, सूर्यफूल, कापूस खरडून गेला

निवेदनात माजी आ. बेटमोगरकर यांनी म्हटले आहे की, चार दिवसांपासून तालुक्यात पावसाची संततधार होती. रविवारी उत्तरा नक्षत्राचे आगमन होताच पावसाने रौद्ररुप धारण केले. सोमवारी रात्री पावसाने तालुक्याला झोडपून काढले.काही तासात शहरासह अनेक गावात पाणीच पाणी झाले. नदीकाठावरील गावे पाण्याने वेढल्या गेली. अनेक छोटे, मोठे नाले, नद्यांना पूर आल्याने सुमारे पाच तास वाहतूक ठप्प पडली. नदीकाठावरील पिके वाहून गेली. अंदाजे 30 हजार हेक्टरवरील सोयाबीन, ज्वारी, उडीद, सूर्यफूल, कापूस खरडून गेला. तसेच धामणगाव, चांडोळा, माऊली, उच्चा, होनवडज आदी गावातील जुन्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. बेटमोगरा, चांडोळा, होनवडज, बार्‍हाळी, येवती, धामणगाव, मुक्रमाबाद, मोटारगा, हंगरगा, माऊली, उच्चा गावातील पिकांना मोठा फटका बसला.

अशोकराव चव्हाण यांना निवेदनाद्वारे केली आहे

काढणीला आलेले सोयाबीन, ज्वारी व राशीसाठी तयार असलेल्या उडीदाचेही मोठी नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने   नुकसानग्रस्त भागांची पाहणी करावी, पिकांचे पंचनामे करावे आणि नुकसानीची तातडीने भरपाई देऊन नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना निवेदनाद्वारे केली आहे. तसेच निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी व तहसीलदारांनाही देण्यात आल्या आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excessive rainfall in Mukhed taluka should be compensated by Thaman, Panchnama Former mla Betmogrekar nanded news