खरिपाच्या पेरणीला मोसमी पावसाची साथसंगत

himayatnagr.jpg
himayatnagr.jpg

हिमायतनगर, (जि. नांदेड) ः तालुक्यात खरीप पेरणीतील काही शेतकऱ्यांचे सोयाबीन फिरले असून अशा शेतकऱ्यांना पहिले पेरलेले सोयाबीन मोडून दुबार पेरणी करावी लागत आहे. तर उर्वरित कपाशी व ज्वारी, अशा सर्व पिकांची स्थिती बऱ्यापैकी दिसून येत आहे. तालुक्यातील सरसम, जवळगाव, स्थानिक हिमायतनगर वर्तुळात अतिशय चांगल्याप्रकारे पावसाची नोंद झाली आहे. तसेच सद्यःस्थितीत निंदणी व कोळपणीच्या कामाला चांगल्याप्रकारे वेग आला आहे.


तालुक्यातील डोंगराळ भागात शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कपाशीची लागवड अधिक आहे. तर सखल भागात जिथे सोयाबीनच्या काढणीनंतर हरभरा, करडई असे उन्हाळी पीक घेता येते तिथे सोयाबीनचा पेरा अव्वल प्रमाणात आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा बहुतांश शेतकऱ्यांनी हळद लागवड केली आहे.

सोयाबीन उगवलेच नाही
हिमायतनगर तालुका हा संपूर्ण कोरडवाहू शेतीचा भाग असून एका खरिपाच्या हंगामावरच शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. त्यामुळे खरिपाच्या पेरणीला विशेष महत्त्व दिले जाते. यावर्षी रोहिण्या चांगल्याप्रकारे बरसल्या, त्यानंतर मृग नक्षत्राच्या जोरदार पावसाने चांगली सुरवात केली. त्यामुळे खरिपाच्या पेरणीला मोसमी पावसाची चांगल्याप्रकारे साथसंगत मिळत आहे. दुर्दैवाने सोयाबीनचे बोगस बियाणे बाजारात आल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केलेले सोयाबीन उगवलेच नाही. परिणामी अशा शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची नौबत आली आहे. बाकी उर्वरित पीक परिस्थिती सध्यातरी चांगली दिसून येत आहे.


मार्गदर्शन व मदत करण्याची मागणी
कोरोना संसर्गजन्य महामारीच्या काळात शेतकऱ्यांना बिघडलेल्या अर्थव्यवस्थेचा जबर फटका बसत आहे. बाजारातून गेल्या वर्षीच्या दरापेक्षा कितीतरी अधिक पटीने या वर्षी शेतकऱ्यांना आगाऊ पैसे मोजून बी-बियाणे व रासायनिक खतांची खरेदी करावी लागली आहे. आता पुढे कपाशी व सोयाबीनला खताची मात्रा देणे गरजेचे असून कीटकनाशक औषध खरेदी करून फवारणीची तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे संबंधित कृषी विभागाने या बाबीची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात मार्गदर्शन व मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून पुढे आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com