‘या’ तालुक्यात खरिपाच्या पेरण्यांना प्रारंभ...!

अनिल कदम
Saturday, 13 June 2020


मृग नक्षत्राचा मैस वाहनाने प्रवेश झाला. त्यानंतर तालुक्यात दोन दिवस ढगाळ वातावरण तयार झाले. बुधवारी (ता.दहा) रोजी दुपारनंतर तालुक्यात सर्वदूर मेघगर्जनेसह पाऊस झाला. या दिवशी ६५ मी.मी.पाऊस बरसला. त्यानंतर (ता.११) रोजी पावसाने चांगलीच एन्ट्री केली.

देगलूर, (जि. नांदेड) ः मृग नक्षत्राचा मैस वाहनाने प्रवेश झाला. त्यानंतर तालुक्यात दोन दिवस ढगाळ वातावरण तयार झाले. बुधवारी (ता.दहा) रोजी दुपारनंतर तालुक्यात सर्वदूर मेघगर्जनेसह पाऊस झाला. या दिवशी ६५ मी.मी.पाऊस बरसला. त्यानंतर (ता.११) रोजी पावसाने चांगलीच एन्ट्री केली. सर्वच मंडळात मिळून सरासरी ८०.०५ मिमी पाऊस झाला. त्यातही हाणेगाव, मरखेल, माळेगाव मंडळात कमी पाऊस झाला. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मात्र खानापूर, देगलूर, शहापुर या मंडळात पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांना प्रारंभ केला आहे, तर काहींनी (ता.१२) रोजी पेरणी सुरू केली असून काही शेतकऱ्यांनी कापूस लागवडीलाही सुरवात केली आहे.

मंडळ निहाय पर्जन्यमान
देगलूर ९९ मी.मी., खानापूर ६४ मी.मी., शहापूर ६४ मी.मी., मरखेल ३६ मी.मी., माळेगाव ५८ मी.मी., हाणेगाव ४२ मी.मी. या वर्षातला आज पर्यंतचा पाऊस झाला.

खरीप पेरणीसाठी प्रस्तावित क्षेत्र
तालुक्यात ५८ हजार ८१३ हेक्‍टर क्षेत्र लागवडीलायक असून त्यात ३० हजार हेक्‍टर क्षेत्र सोयाबीनसाठी तर ९८०० क्षेत्र कापूस, तूर ५६०० हेक्‍टर क्षेत्र ५८०० मुग तर ५८०० उडीद, खरीप ज्वारी व भात पिकासाठी ७५० हेक्‍टर क्षेत्र या वर्षीच्या खरीप पेरणीसाठी प्रस्तावित असून या उपरही कापूस पिकाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -  राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची सीबीआयमार्फत चौकशी करा- आमदार राजूरकर

सोयाबीनची चढ्या भावाने विक्री
या भागात सोयाबीन हे गेल्या काही दिवसापासून मुख्य पीक बनले आहे त्यामुळे सहाजिकच बियाण्यांना वरचेवर मागणी वाढत झालेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन ते अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांनी बी-बियाणे खरेदी करण्यासाठी बाजारात येण्याचे टाळले, त्यामुळे याचा फायदा व्यापारी उचलत आहेत. मला नसल्याचे कारण पुढे करत यामध्ये नफेखोरी करत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी मृगालाच पाऊस झाल्याने पेरणी लवकर सुरू झाल्या आहेत. शेजारील तेलंगणामध्ये दरवर्षी सोयाबीनच्या बॅगा मिळत होत्या मात्र यावर तिथेही कडक निर्बंध घातले गेल्याने तिकडेही सोयाबीनची बॅग मिळायला तयार नाही. त्यामुळे येथील व्यापारी १७०० ची बॅग २२०० रुपयाला विक्री करीत आहेत. या वेळी शेतकऱ्यांनी तरी दाद कोणाकडे मागावी? हा प्रश्न पडलेला आहे. कृषी दुकानांचे दररोज स्टॉक तपासून त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र हे धाडस कृषी विभाग दाखवेल काय हे आता बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

करडखेड प्रकल्पात दहा सेमीची वाढ
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या करडखेड मध्यम प्रकल्पात दोन दिवसाच्या पाण्याने दहा सेंटीमीटरची वाढ झाली असून सध्या प्रकल्पात ७१ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे तीन दिवस आड शहरवासीयांना दिला जाणारा पाणीपुरवठा आता एक दिवसानंतर करावा अशी मागणी शहरवाशीयांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Farmer Began To Work, Nanded News