
रणरणत्या उन्हातही पेरणीपूर्व मशागतीची ‘लगीनघाई’
मारतळा : ग्रामीण भागात सध्या लग्नाचा धुमधडाका सुरू असल्याने एकीकडे लग्नसराई, तर दुसरीकडे मृग नक्षत्र तोंडावर आल्याने रणरणत्या उन्हातही पेरणीपूर्व मशागतीसाठी बळीराजाची शेत शिवारात लगबग सुरू असल्याचे चित्र मारतळासह परिसरात पहावयास मिळत आहे. यंदा कापूस आणि सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मृग नक्षत्र काही दिवसांवर येऊन ठेपल्याने पेरणीच्या वेळी घाई नको म्हणून शेतकरी आतापासूनच मशागतीच्या कामाला लागले आहेत.
नांगरणी, वखरणी, शेणखत टाकणे आदी कामे अंतिम टप्प्यात आली असून काडी कचरा, चिपाड वेचणी सध्या सुरू आहे. मात्र, सध्या रणरणत्या उन्हाच्या वाढत्या पा-यामुळे भल्या पहाटेपासूनच शेतकऱ्यांनी खरीप पूर्व कामासाठी लगबग सुरू आहे. दरम्यान, परिसरात गतवर्षी सोयाबीन, तूर, कापूस पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली होती. मात्र कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकांना चांगला भाव मिळाल्यामुळे या पिकाचे क्षेत्र वाढणार असल्याचे असल्याचा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.
बाजारात बियाणे व खताची चाचपणी
सध्या काही शेतकरी कोणकोणत्या नवीन कंपनीचे बियाणे बाजारात आले आहेत, याची माहिती घेत आहेत. तसेच भाववाढ, रासायनिक खते, बी -बियाणे याची चाचपणी करत आहेत. तसेच वाढत्या महागाईचा फटका यंदाही शेती मशागतीचे कामास बसत आहे.
Web Title: Farmer Sowing In Summer Cotton And Soybean Crop Is Likely To Increase Nanded
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..