शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास होतोय अधिकच घट्ट, काय कारण? वाचाच

प्रमोद चौधरी
Thursday, 3 September 2020

एकीकडे निसर्गाचे बदललेले चक्र आणि दिवसेंदिवस शासकीय यंत्रणेकडून होणारी फरफट यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती तळागाळात गेली आहे. त्यामुळे देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असून मराठवाड्यातही ही संख्या प्रचंड आहे. 

नांदेड : शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे ऐकताच अंगावर शहारे उभे राहतात. कोणाच्याही हृदयाचा ठोका चुकवेल अशी ती घटना असते. त्या शेतकरी कुटुंबातील भयानक आर्त कल्लोळ मन छिन्न-विछिन्न करून सोडतो. जीवनाचा थांग हरवून टाकणाऱ्या या शेतकरी आत्महत्येचा फास सैल होण्याचे नावच घेत नाही. शासकीय धोरण आणि नैसर्गिक प्रकोपात अजून तो अधिकच घट्ट होत चालला आहे. एकंदरीतच शासकीय धोरण अन निसर्गाच्या प्रकोपात शेतकऱ्याच्या गळ्याचा फास घट्ट होत चालला आहे.

१९९१ पासून निसर्गचक्रामध्ये झालेला बदल, त्यामुळे सातत्याने पाण्याचा दुष्काळ, नापिकी आणि उत्पादकतेतवर झालेला परिणाम यामुळे शेतकऱ्यांच्या घरातील धणगीला उकरीच लागली आहे. मध्यंतरी पावसाचा लाभ होऊन शेती पिकली तरीसुद्धा बाजारपेठेत मिळणारा कमकुवत भाव आणि आयात-निर्यात, हमीभाव, शासकीय धान्य खरेदी केंद्रांवरील घोळ, उदासीन व भ्रष्ट यंत्रणेपायी शेतकरी योजनांचा होणारा बट्ट्याबोळ यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच मुस्कटदाबी होत आहे.

हेही वाचा - नांदेड पोलिस परिक्षेत्राची कमान निसार तांबोळी यांच्या हाती

यंदा वेळेवर पाऊस झाल्याने पिकेही चांगलीच बहरली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. परंतु, हाता-तोंडाशी आलेली पिके पावसाने हिरावली. आहे त्या पिकांवर किड्यांचा प्रादुर्भाव झाल्याने नेस्तनाबूत झाल्याने केवळ शेती व्यवसायावर निर्भर असणारे कुटुंब हतबल झाले आहेत. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी शासकीय योजना आहेत, मात्र त्याचा लाभ कोरडवाडू शेतकऱ्यांना होण्याऐवजी सधन भागातील शेतकऱ्यांनाच अधिक होत असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.  

हे देखील वाचाच - स्वॅब देण्यासाठी आलेल्या नागरिकांचे हाल  प्रशासनाचे दुर्लक्ष; महिला, मुलांची कुचंबना

वाढत्या शेतकरी आत्महत्येला सर्वस्वी कारण म्हणजे शासनाचे शेतकरी विरोधी धोरण व कायदे. केवळ निसर्गचक्रावर दोष देऊन होणार नाही, संकटकाळी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला तयार नसून, उलट फसव्या घोषणा करून, त्यांचे मानसिक, आर्थिक शोषण करीत आहे. मानसिक, सामाजिक व आर्थिक असा एकत्रित तणाव शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास बनला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शिवनाथ कोरडे यांनी सांगितले.

येथे क्लिक कराच - नांदेड : लॉकडाऊच्या कालावधीत अटी व शर्तीसह 30 सप्टेंबरपर्यंत वाढ

शेतीपूरक व्यवसायाला चालना द्यावी
केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी शेतीला पूरक असा व्यवसाय करून आत्मनिर्भर बनण्याची आज गरज आहे. कारण शेतमाला रास्त भाव मिळत नसल्याने, तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे आर्थिक संकटापायी शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे टाळण्यासाठी शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाने, कृषी विभागाने पुढाकार घ्यायला पाहिजे.
- प्रा. सुनिता सुक्रे, नांदेड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers In Crisis Again Due To Crop Damage, Nanded News