अल्पभूधारक शेतकऱ्याचा कुटूंबीयासह आत्मदहणाचा इशारा

प्रभाकर लखपत्रेवार
Tuesday, 8 September 2020

वजिरगाव येथे राहणारे अल्पभूधारक शेतकरी संतोष बाबाराव ढगे यांनी ११ सप्टेंबर रोजी कुटंबीयासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

नायगाव (नांदेड) : रेती किंवा रेती व्यवसायाशी संबंध नसताना नायगावच्या तहसीलदारांनी शेतावर २६ लाख १४ हजार ८०० रुपये गौण खनिजाच्या टाकलेल्या बोजामुळे कुठलीही बँक कर्ज देण्यास तयार नाही. दुसरीकडे महसूल विभाग बोजा कमी करण्यास तयार नसल्याने वैतागलेले वजिरगाव येथे राहणारे अल्पभूधारक शेतकरी संतोष बाबाराव ढगे यांनी ११ सप्टेंबर रोजी कुटंबीयासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

नायगाव तालुक्यातील वजिरगाव येथील शेतकरी संतोष बाबाराव ढगे यांनी २८ ऑगस्ट २०२० ला नांदेड येथील जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दिली असून यात मी व्यवसायाने शेतकरी आहे. वजिरगाव येथे शेत जमीन गट क्र. ३४५ मध्ये ३७ आर जमीन, गट क्र. २३ मध्ये ८४ आर, गट क्र. २२९  मध्ये ४६ आर तर गट क्र. ६६ मध्ये २८.७४ आर शेती अशी एकूण १ हेक्टर ९५.७४ शेती आहे. माझी उपजीविका या शेतजमीनीवरच असून काबाडकष्ट करून मी माझ्या कुटुंबाचे पालन पोषण करतो. माझा गौन खनिजाशी किंवा वाळू अथवा रेती व्यवसायाशी कोणताही संबंध नाही. इतकेच नव्हे तर माझ्या शेतात रेती नाही. असे असताना नायगाव तहसिलदार सुरेखा नांदे यांनी माझ्यावरील शेताच्या ७/१२ उताऱ्याच्या इतर अधिकारात गौन खनिज देय बोजा २६ लाख १४ हजार ८०० रुपये एवढा बोजा टाकला. त्याचा फेरफार क्र‌. १४३५ आहे. 

तहसील कार्यालयाने घेतलेल्या या नोंदीमुळे मला कोणत्याही बँकेतून कर्ज मिळत नाही. त्यामुळे मी सर्वसामान्य शेतकरी हैराण झालो आहे. टाकलेला बोजा कमी करण्यासाठी अनेक दिवसांपासून तहसीलचे उंबरठे झिजवत असतांना तहसीलदार कसलाच प्रतिसाद देत नाहीत. या बाबीची वरिष्ठ पातळीवरुन चौकशी करावी व जर ही नोंद खोटी निघाली तर तहसिलदार सुरेखा नांदे यांना तत्काळ तहसीलदार पदावरुन बडतर्फ करावे किंवा निलंबीत करावे. माझ्या शेतात तर वाळू नाहीच पण माझा वाळूशी कुठलाच संबंध नसतांना टाकलेल्या बोजामुळे माझी मनस्थिती बिघडली असून न केलेल्या पापाचे प्रायश्चित भोगण्यास संबंधितास भाग पाडावे. जर या बाबीची चौकशी तक्रार दिल्यापासून ११ दिवसाच्या आत झाली नाही व माझ्या ७/१२ उताऱ्यावरुन ही बेकायदेशीर नोंद कमी केली नाही तर मला माझ्या कुटुंबीयासह माझ्या शेतातच मला ११ सप्टेंबर २०२० रोजी आत्मदहन करावे लागेल याची नोंद घ्यावी, असा इशारा दिला आहे. 

तक्रारदाराकडून दबावतत्रांचा वापर... 

तक्रारदाराने मागच्या वर्षी चोरुन रेती काढली, त्यामुळे पथकाने चौकशी करुन वाळू काढल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हा बोजा टाकला. ही घटना मागच्या वर्षीची आहे. वर्षभर गप्प बसलेल्या ढगे यांनी अचानक कुटूंबीयासह आत्मदहन करण्याचा इशारा देणे, ही बाब चुकुची तर आहेच. पण दबावतंत्राचा वापर करुन स्वतःच्या चुकीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न ही आहे, असे नायगावच्या तहसीलदार सुरेखा नांदे म्हणाल्या. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in Naigaon have warned of self immolation along with their families