नांदेडमधील शेतकरी, प्लॉटधारक का आहेत आत्मदहनाच्या तयारीत, घेतली आमदाराची भेट

प्रल्हाद कांबळे
Monday, 31 August 2020

कोरोनाच्या काळामध्ये आगोदरच शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच्या शेतमालाला भाव नाही, आर्थिकस्थिती अत्यंत बिकट झाली आहे आणि ज्या आहेत त्या जमिनी जर सरकार विकास कामासाठी घेत असेल तर आम्ही जगून उपयोग काय?

नांदेड : प्रस्तावित विकास आराखड्यामुळे हैरान झालेल्या शेतकरी, प्लॉटधारक यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवसस्थानी जाऊन भेट घेतली आणि आम्हाला आत्मदहनाची परवानगी द्या, असे निवेदन दिले.

पुढे निवेदनात म्हटले आहे की, ऑगस्ट 2019 मध्ये नगररचना विभागाने प्रस्तावित विकास आराखडा तयार केला. त्यात नांदेड उत्तरमध्ये मोठ्या प्रमाणात शेती आणि प्लॉट, घरे यांच्यावर आरक्षणे टाकले आहेत. आता तर नगररचना विभागाच्या नोटीस शेतकऱ्यांना येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे तो अधिकच घाबरला आहे. कोरोनाच्या काळामध्ये आगोदरच शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच्या शेतमालाला भाव नाही, आर्थिकस्थिती अत्यंत बिकट झाली आहे आणि ज्या आहेत त्या जमिनी जर सरकार विकास कामासाठी घेत असेल तर आम्ही जगून उपयोग काय? सांगवी भागात मागे 2005-6 मध्ये विमानतळ आणि रेल्वे कार्यालयासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या होत्या. 

हेही वाचा - ‘या’ ठिकाणी कोरोनामुक्तीसाठी संकटमोचन महाआरती
 

विकासाच्या नावाखाली त्यांचे प्लॉट आरक्षित करण्यात येत आहेत

त्यातील काही शेतकऱ्यांना अजून मोबदला मिळाला नाही. आणि पुन्हा त्याच भागातील शेतकऱ्यांच्या जमिनींवर खोडसाळपणे आरक्षण टाकणे कितपत योग्य आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्मदहनाचे निवेदन  जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक नांदेड यांना दिलेले आहे. देशभरात कोरोना योद्धे (पोलीस, आरोग्य कर्मचारी, मनपा कर्मचारी, महसूल कर्मचारी) यांच्या कार्याचे कौतुक होत असताना नांदेडमध्ये मात्र विकासाच्या नावाखाली त्यांचे प्लॉट आरक्षित करण्यात येत आहेत. जे प्लॉट त्यांनी कर्ज काढून घर बांधण्यासाठी घेतले आहे, तो देखील हवालदिल झाला आहे. आणि त्याचे मनोबल ढासळत आहे.

मी या अडचणीत तुमच्यासोबत आहे

या सर्व प्रश्नांवर उत्तर देताना आ. बालाजी कल्याणकर म्हणाले की, हा प्रश्न मी नगरसेवक असताना सभागृहात मांडला, आमदार झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनात मांडला. मी या अडचणीत तुमच्यासोबत आहे. लवकरच  पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन यातून मार्ग काढू. निवेदन देताना संघर्ष समिती अध्यक्ष केशव कल्याणकर, उपाध्यक्ष चक्रधर कोकाटे, शिवाजी जाधव, सचिव निलेश बायस, कोषाध्यक्ष शिवाजी स्वामी, सहसचिव सौ. सविता भातम्बरे, सुधीर देशमुख आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in Nanded, why plot holders are preparing for self-immolation, visited MLA nanded news