
सध्या वैयक्तिक दावे केलेल्यांना विमा परतावा मिळत आहे. परंतु इतर अर्जदारांना मात्र खरीप पिकांची उत्पादकता तसेच अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतर विम्याबाबत निर्णय होईल अशी माहिती सुत्रांकडून मिळाली.
नांदेड : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२० साठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत नऊ लाख ५२ हजार ७२२ अर्जदार शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने पिकविमा भरला. यातून पाच हजार ३० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. यापोटी विमा संरक्षित रक्कम दोन हजार ९८ कोटी रुपये आहे. सध्या वैयक्तिक दावे केलेल्यांना विमा परतावा मिळत आहे. परंतु इतर अर्जदारांना मात्र खरीप पिकांची उत्पादकता तसेच अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतर विम्याबाबत निर्णय होईल अशी माहिती सुत्रांकडून मिळाली.
नांदेड जिल्ह्यात दरवर्षी लाखो शेतकरी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होतात. यावर्षी खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये खरीप पिकासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने पिक विमा भरला आहे. यात उडीद, कापूस, मूग, तूर, खरीप ज्वारी व सोयाबीन या पिकासाठी शेतकऱ्यांनी नऊ लाख ५२ हजार ७२२ अर्ज दाखल केले आहेत. यात शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी ४४ कोटी ४५ लाख रुपये कंपनीकडे भरले आहे. यातून पाच हजार ३० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. तर दोन हजार ९८ कोटी रुपये विमा संरक्षित रक्कम आहे.
हेही वाचा - नांदेड : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन
जिल्ह्यात यंदा सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी तसेच ऑक्टोबरमधील परतीच्या पावसामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल अशी आशा आहे. दरम्यान सप्टेंबर - ऑक्टोबर मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक दावे दाखल करावी असे आवाहन विमा कंपनीने तसेच प्रशासनाने केले होते. त्यानुसार ज्या शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. अशा ६३ हजार शेतकऱ्यांना ६४ कोटी रुपयांचा परतावा आजपर्यंत मिळाला आहे.
हे देखील वाचाच - नांदेड : हैदराबाद- जयपूर, सिकंदराबाद- शिर्डी, काकिनाडा- शिर्डी या तीन विशेष गाड्या सुरु
अद्यापही जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी परताव्यापासून वंचित आहेत. तर ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक दावा दाखल केला नाही अशा शेतकऱ्यांनाही विमा मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनांसह केली जात आहे. दरम्यान शासनाने जिल्ह्यात सरसकट पीक विमा जाहीर करावा, अशी मागणी जोर आता जोर धरू लागली आहे.