शेतकऱ्यांची ‘साडेसाती’ संपेना

nnd11sgp05.jpg
nnd11sgp05.jpg

माळाकोळी, (ता.लोहा, जि. नांदेड) ः कधी दुष्काळ...कधी अतिवृष्टी...शेतीमालाला भाव नाही यासह अन्य नैसर्गिक संकटे शेतकऱ्यांच्या ‘पाचवीलाच’ आहेत. अशा अनेक संकटांना तोंड देत शेती करत असताना उत्पादन खर्चही निघणे कठीण बनत चालले आहे. मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाला, पिके जोमात आली यामुळे शेतकऱ्यांनी फवारणी, खुरपणी, खते यासाठी मोठा खर्च केला. यावर्षी सुगी चांगली येईल असे वाटत असतानाच शेवटच्या टप्प्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे संपूर्ण पिके वाळून गेली. सततचा दुष्काळ व अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक संकटांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांची ‘साडेसाती’ संपण्याचे नाव घेत नाही. 


दहा बॅग सोयाबीन पेरणी 
माळाकोळीपासून जवळच असलेल्या विठोबा तांडा येथील शेतकरी साहेबराव धेना राठोड व श्याम धेणा राठोड या दोन भावांनी दहा बॅग सोयाबीनची पेरणी केली होती. संपूर्ण सोयाबीन पाऊस नसल्यामुळे वाळून गेले आहे. यामुळे सोयाबीन पेरणीसाठी केलेला खर्चही निघण्याची शक्यता दिसत नाही. विठोबा तांडा येथील शेतकरी साहेबराव राठोड व त्यांचे भाऊ श्याम राठोड हे प्रयोगशील व कष्टाळू शेतकरी म्हणून परिसरात परिचित आहेत. त्यांनी यावर्षी आपल्या नऊ एकर शेतीत दहा बॅग सोयाबीन पेरणी केली होती. मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे पिके जोमात आली. यामुळे त्यांनी खुरपणी, फवारणी, खते यासह शेतीमध्ये मोठा खर्च केला; मात्र शेवटच्या टप्प्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे संपूर्ण दहा बॅग सोयाबीन वाळून गेले आहे. 


मोठ्या अडचणींचा सामना 
५० क्विंटलपेक्षाही जास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता होती; मात्र आता शेंगा भरल्याच नसल्यामुळे उत्पन्न २५ टक्के सुद्धा मिळण्याची शक्यता नाही. यामुळे त्यांनी शेतात केलेला खर्च निघणे कठीण बनले आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून असल्यामुळे सदर नुकसान फार मोठे असल्याचे ते सांगतात. पंधरा सदस्य असलेल्या कुटुंबाचा गाडा ते शेतीच्या उत्पन्नावर चालवतात. यामुळे यावर्षीच्या झालेल्या नुकसानीमुळे सदर कुटुंबीय मोठ्या अडचणींचा सामना करत असून विमा कंपनीने सदर नुकसानीकडे लक्ष देऊन पंचनामा करण्याची आवश्यकता आहे. 


शेतीत आम्ही मोठा खर्च केला 
पाऊस काळ चांगला असल्यामुळे यावर्षी शेतीत आम्ही मोठा खर्च केला होता; मात्र पोळा सणानंतर पाऊस उघडला व संपूर्ण दहा बॅग सोयाबीन वाळून गेले. १५ सदस्य असलेल्या कुटुंबाचा गाडा चालवणे अवघड बनले आहे. अस साहेबराव राठोड या शेतकऱ्याने सांगितले. 
तसेच दरवर्षी कष्ट करून आम्ही शेती पिकवतो व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो; मात्र यावर्षी शेतीमध्ये खर्च केलेले पैसे सुद्धा निघण्याची शक्यता नाही. त्यामुळे यावर्षी डोक्यावर कर्ज वाढण्याची चिंता आहे. असे श्‍यामराव राठोड यांनी सांगितले.

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com