बळिराजाची कमाल; मोटारसायकलला जुंपले वखर

ghogri.png
ghogri.png

घोगरी, (ता. हदगाव, जि. नांदेड) ः या वर्षी मृगनक्षत्रात पाऊस बऱ्यापैकी होण्याने या भागातील पेरण्या अगदी वेळेवर झाल्या आहेत. लागवड केलेल्या कापसाची उगवणक्षमता चांगली झाली असल्याने वखरणी, निंदणी, खुरपणीला वेग आल्याचे चित्र आहे. घोगरी (ता. हदगाव) येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याकडे शेतीपूरक कामे करण्यासाठी बैलजोडी नसल्याने त्यांनी युक्ती लढवून चक्क मोटरसायकलला वखर जुंपून जवळपास तीन एकर शेतीतील डवरणी केली आहे. कमी खर्चात चांगली डवरणी होण्याने बळिराजा समाधानी झाला आहे.


शेतीपूरक कामे अगदी वेळेवर 
घोगरी (ता. हदगाव) येथील अल्पभूधारक शेतकरी लक्ष्मण गुलेवाड व शिवप्रसाद गुलेवाड यांनी या वर्षीच्या मृग नक्षत्रात तीन एकर शेतीवर कापूस लागवड केली आहे. जमीन खडकाळ व कोरडवाहू असल्याने इतर पिकांची शाश्वती कमी असल्याने प्रतिवर्षी ते कापसाचे पीक घेतात. या वर्षीच्या मृग नक्षत्रात बऱ्यापैकी पाऊस होण्याने व वेळेवर लागवड केल्याने कापसाची उगवण क्षमताही चांगली झाली. यामुळे चुका भरण्याचा धोका जवळपास टळला असल्याने कापसाची वखरणी, निंदणी, खुरपणीला वेग आल्याचे दिसून येत आहे. याशिवाय कोरोना लॉकडाउनमुळे मंजूरदार गावातच मिळत असल्याने शेतीपूरक कामे अगदी वेळेवर होत आहेत.

जवळपास तीन एकर शेतातील कापसाची वखरणी
मजुरांच्या हातालाही काम मिळत आहे. परंतु, गेल्या तीन ते चार वर्षांपासून या परिसरात निसर्गाच्या प्रकोपामुळे, कधी अल्प पाऊस, कधी जास्तीचा पाऊस होण्याने, शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली सुगी वाया जात असल्याने नाईलाजाने अनेक शेतकऱ्यांनी आपली बैलजोडी विकून यंत्राच्या साह्याने (ट्रॅक्टर) शेतीची पूर्वमशागत करीत आहेत. यामुळे प्रत्येक गावातील बैलजोड्यांचे प्रमाण कमी झाले आहे. याचा फटका गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांना बसला असून मृग नक्षत्राचा पाऊस अगदी वेळेवर पडल्याने इतर शेतकऱ्यांप्रमाणेच आपणही निघालेल्या कापसात डवरणी, वखरणी करावी यासाठी प्रयत्नशील असतानाही बैलजोडीअभावी त्यांना वखरणी साध्य होत नाही. कापसात जास्तीचे गवत होण्याने निंदणी, खुरपणीसाठी लागणारा खर्च परवडत नसल्याचे पाहून घोगरी येथील लक्ष्मण गुलेवाड व साईप्रसाद गुलेवाड या बाप-लेकांनी युक्ती लढवून चक्क मोटारसायकलला वखर बांधून हळूहळू प्रत्येक तासाने मोटार चालवून जवळपास तीन एकर शेतातील कापसाची वखरणी उरकून घेतली आहे.


कापूस निघाल्यापासून कापसाची डवरणी साधारणतः चार ते पाच वेळा करावी लागते. प्रत्येक वेळच्या वखरणीसाठी बैलजोडी धारकास कमीत कमी एक हजार रुपये द्यावे लागतात. हे परवडणारे नसल्याने मोटरसायकलला वखर बांधून वखरणी करण्याचे प्रयत्न केले. हा प्रयोग यशस्वी ठरला असून पेट्रोलसाठी केवळ तीनशे रुपये खर्च आला आहे. याद्वारे वखरणीही किफायतशीर ठरणारी आहे.
- लक्ष्मण गुलेवाड, घोगरी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com