नांदेडच्या महिला व बाल विकास अधिकारी आणि बालकल्याण समितीवर गुन्हे दाखल करा- प्रहार जनशक्ती पक्ष

गंगाधर डांगे
Saturday, 6 March 2021

भाग्यनगर परिसरातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, नांदेडच्या बालकल्याण समितीवर गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन

मुदखेड (जिल्हा नांदेड) : शहरामधील आश्रमशाळेत एका निरागस बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी भाग्यनगर परिसरातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, नांदेडच्या बालकल्याण समितीवर गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल देशमुख आणि शहर प्रमुख प्रितपालसिंघ शाहु यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना दिले आहे.

ता. चार मार्च रोजी प्रहार संघटनेच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय क्रमांक जे.जे.ए.-2017/प्र.क्र.53(भाग-2)/का-08 ता. आठ मार्च 2019 चा उल्लेख करून लिहिले आहे की, या निर्णयानुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आणि बालक कल्याण समिती नांदेड यांच्याविरुध्द गुन्हे दाखल करण्यात यावे. मुदखेडच्या बालगृहात मुलींना ठेवण्याची मान्यता नाही. मुलींना सुरक्षीतता नाही आणि त्यामुळेच तेथे मुलीवर अत्याचार झाला.

उच्च न्यायालय मुंबईच्या आदेशानुसार बालकाश्रमात मुलांना आणि मुलींना एकत्र ठेवायचे असल्यास स्वतंत्र इमारती आवश्यक आहेत असे असतांनाही मुदखेडमध्ये मुले आणि मुली यांना एकत्र ठेवण्यात येत होते. ही परिस्थिती असतांना महिला व बालविकास अधिकारी नांदेड आणि बाल कल्याण  समिती नांदेड यांनी बाल न्याय अधिनियमातील कोणत्याही नियमाचे पालन केलेले नाही. यामुळे तेथे बालिकेवर झालेल्या अत्याचारास बाल विकास अधिकारी नांदेड आणि बालकल्याण समिती नांदेड हे जबाबदार आहेत. सोबतच मुदखेड येथील आश्रमाची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रति राज्यमंत्री बच्चु कडू, पोलिस उपमहानिरिक्षक नांदेड आणि पोलिस अधिक्षक नांदेड यांनाही देण्यात आल्या आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: File a case against Nanded Women and Child Development Officer and Child Welfare Committee Prahar Janshakti Party