file photo
file photo

नांदेडमध्येही पहिल्यांदाच साखरविरहीत काळ्या गव्हाची लागवड यशस्वी

नांदेड : देशातील पंजाब, हरियाणा राज्यात काळ्या गव्हाची लागवड चांगलीच वाढलीय. नांदेडमध्ये देखील एका युवा शेतकऱ्यांने काळ्या गव्हाचे यशस्वी उत्पादन घेतले. शेतकऱ्यांना मालामाल करणारी काळ्या गव्हाची शेती नेमकी कशी केल्या जाऊ शकते. त्या गव्हाचा काय फायदा आहे याबद्दल सविस्तर माहिती शेतकऱ्यांनी दिली. 

मधुमेहींसाठी उत्तम पर्याय !

मोहाली इथल्या कृषी विद्यापीठाने गव्हाच्या बियाण्यांचे मिश्रण करुन काळ्या गव्हाचे वाण विकसीत केले आहे. आरोग्यासाठी मोठा लाभदायी असल्याने हा काळा गहू आता सर्वानाच परिचित झाला. या काळ्या गव्हाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्या सोबतच सर्वसाधारण गव्हापेक्षा या काळ्या गव्हात साखरेचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने मधुमेही रुग्णाला देखील या गव्हाचे सेवन करता येते. सध्या बाजारात सत्तर ते शंभर रुपये किलो या दराने या गव्हाची विक्री होत असल्याने या गव्हाकडे शेतकरी आकर्षीत झालेत.

काळ्या गव्हाची कशी घ्यायची काळजी?

गहू पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया जैविक निविष्ठांची गोकृपामृत फवारणी दोन वेळा करावी लागते. दोन्ही वेळा दूध, गूळ, अंडी यांच्या मिश्रणाची फवारणी केल्यास अजून उत्तम, तर या गव्हाची उगवण झाल्यावर एकदा कोळपणी करावी लागते. पाण्याच्या साधारणतः पाच पाळ्या द्याव्या लागतात. तर ओंब्यामध्ये गहू निसवतांना आंबट ताक फवारणी केल्यास अजून उत्तम, नांदेडच्या अर्जुन जाधव या शेतकऱ्यांने 25% रासायनिक व 75 % जैविक निविष्ठांचा वापर केला आहे. आवळा पावडरची फवारणी केल्यास या गव्हावर कुठल्याही कीड रोगांचा प्रादुर्भाव होत नसल्याचे या शेतकऱ्यांने सांगितले.

बियाण्यांची उपलब्धता आणि उत्पादन

काळ्या गव्हाचे बियाणे साधारणतः साठ रुपये किलो दराने बाजारात उपलब्ध आहे. एका एकर क्षेत्रावर चाळीस किलो बियाण्याची पेरणी केल्यास सर्व साधारणपणे बारा ते पंधरा क्विंटल उत्पादन होऊ शकते. बाजारात जवळपास सात हजार रुपये क्विंटल दराने या गव्हाची खरेदी होते. एका एकर जमिनीत काळ्या गव्हाचे पीक घेण्यासाठी पंधरा ते वीस हजार रुपयांचा खर्च होऊ शकतो तर एकरी दहा क्विंटल उत्पन्न झाले तरी अवघ्या तीन महिण्यात एका एकरमध्ये खर्च जाऊन पन्नास हजार रुपये उत्पन्न सहज होऊ शकते. आपल्या सर्वसाधारण गव्हापेक्षा  काळ्या गव्हाची वेगळी अशी काहीच काळजी घ्यावी लागत नाही. रासायनिक खतांचा वापर केला तरी गव्हाचे उत्पादन होते असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे आगामी काळात आपल्या राज्यात काळ्या गव्हाचे क्षेत्र वाढल्यास नवल नाही.

काळ्या गव्हाला अनुकूल वातावरण

आपल्या राज्यातील हिवाळा आणि फेब्रुवारीत वाढत जाणार तापमान हे काळ्या गव्हासाठी पोषक असे आहे. सर्वसाधारण आणि हलक्या जमिनीत देखील या काळ्या गव्हाचे उत्पादन घेता येऊ शकते. उच्च प्रतीच्या जमीनीत तर काळ्या गव्हाला चांगले उत्पादन येते. नांदेडमध्ये अर्जुन जाधव या शेतकऱ्यांने सेंद्रिय पद्धतीने गहू पिकवलाय. मात्र आपल्या लोकवन जातीच्या गव्हाप्रमाणेच रासायनिक खते आणि किटकनाशके वापरुन देखील काही शेतकऱ्यांनी या गव्हाची पेरणी केलीय. त्या शेतकऱ्यांना देखील या गव्हाचे चांगले उत्पादन येत असल्याचे चित्र आहे.

काळ्या गव्हात साखरेचे प्रमाण कमी

काळा गहू हा आहारासाठी महत्वाचा असून त्यातून साखरेचे प्रमाण कमी मिळते. त्यामुळे या गव्हाला सध्यातरी मधुमेही रुग्णांमध्ये मागणी वाढत आहे. तसेच बाजारपेठेतही त्याला चांगला भाव मिळत असल्याने काही शेतकरी या गव्हाचे पीक घेत आहेत. 
- रविशंकर चलवदे, कृषी जिल्हा अधीक्षक, नांदेड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com