तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली

हाफीज घडीवाला
Saturday, 5 September 2020


नवरंगपुऱ्यात एका कोरोनाबाधित पुरुषाचा मृत्यू झाला होता. यामुळे पूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. अशावेळी गंगापुत्र मच्छीमार संस्थेने शनिवारपासून तलावातून मच्छीमारीची तयारी सुरू केल्याने तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शेख शेरूभाई व ग्रामस्थांनी बुधवारी (ता. दोन) तहसीलदारांना निवेदन देऊन गावात कोरोनामुळे जमावबंदी आदेश लागू असताना जगतुंगमधून मच्छीमारीला मान्यता देऊ नये, अशी मागणी केली होती. 
 

कंधार, (जि. नांदेड)ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जगतुंग समुद्रातून होणारी मच्छीमारी थांबविण्यात यावी, असे आदेश तहसीलदारांनी पोलिसांना दिले असतानाही पोलिसांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. शनिवारपासून (ता.पाच) जगतुंगमधून मच्छीमारीला सुरवात झाली असून यामुळे नवरंगपुरा गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

कोरोनामुळे जमावबंदी आदेश लागू 
(ता.२४) ऑगस्ट रोजी नवरंगपुऱ्यात एका कोरोनाबाधित पुरुषाचा मृत्यू झाला होता. यामुळे पूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. अशावेळी गंगापुत्र मच्छीमार संस्थेने शनिवारपासून तलावातून मच्छीमारीची तयारी सुरू केल्याने तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शेख शेरूभाई व ग्रामस्थांनी बुधवारी (ता. दोन) तहसीलदारांना निवेदन देऊन गावात कोरोनामुळे जमावबंदी आदेश लागू असताना जगतुंगमधून मच्छीमारीला मान्यता देऊ नये, अशी मागणी केली होती. 

हेही वाचा -  नांदेड सलग तिसऱ्या दिवशी त्रिशतकपार, शनिवारी ३७० जण पॉझिटिव्ह

 

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 
तहसीलदारांनी लगेच बुधवारी पोलिस निरीक्षकांच्या नावे आदेश पारित करून जगतुंगमधून होणारी मच्छीमारी थांबवण्याचे म्हटले होते. तहसीलदारांनी आदेश पारित केल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला खरा; परंतु शनिवारी (ता.पाच) सकाळपासूनच मच्छीमारांनी जगतुंगमध्ये उतरून मच्छीमारीला सुरवात केली. यामुळे जगतुंगच्या काठावर माशांच्या खरेदी-विक्रीसाठी बाहेरचे व्यापारी, शहरातील नागरिकांची झुंबड लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. गावात १४४ लागू असताना एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकत्रित आल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. 

 

नवरंगपुऱ्यात कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने प्रशासनाने गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित करा, गावाची नाकेबंदी करा, गावातील लोक बाहेर जाऊ नये आणि बाहेरची लोक गावात येऊ नये अशा सूचना केल्या होत्या. या सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली. मच्छीमारीमुळे कोरोना नियमाचे उल्लंघन होण्याची शक्यता असल्याने तहसीलदारांना निवेदन देऊन मच्छीमारी थांबविण्याची विनंती करण्यात आली होती. तहसीलदारांनी त्या अनुषंगाने नोटीस काढून पोलिस निरीक्षकांना उचित कार्यवाहीचे निर्देश दिले होते. एवढे होऊनही पोलिसांनी मच्छीमारी थांबवली नाही. 
- वसंत निलेवार, सरपंच प्रतिनिधी, नवरंगपुरा (ता.कंधार) 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fishing Hould Not Be Recognized From The Jagtung, Nanded News