दुचाकींच्या अपघातात चार ठार

images.jpg
images.jpg

गोकुंदा, (ता.किनवट, जि. नांदेड) ः किनवट ते तेलंगणा मार्गावर पाटोदा (खुर्द) शिवारात रविवारी (ता.३०) दुपारी दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात चार जण ठार झाले असून गंभीर दोघा जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहीती पोलिसांनी दिली.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, इस्लामपूरा, किनवट येथील गौस अकबर शेख (वय ३९) हे दुचाकीवर समोर मुलगा शेख साहिल शेख गौस (वय सहा), मागे मेव्हुना शेख कलीम (वय ३०) व पत्नी हसीनाबी (वय २६) यांना बसवून किनवटवरून चिखली मार्गे तेलंगणात जात होते. ते किनवटवरून अंदाजे १९ किमी अंतरावर पाटोदा (खुर्द) शिवारातून प्रवास करू लागले. त्याचवेळी मलकापूर-खेरडा येथील रहिवाशी अंकुश दत्तराम जाधव (वय ३१) व गणेश चव्हाण (वय ३०) हे दोघे तेलंगाणातून किनवटकडे येत होते. त्याचवेळी दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाली. घटनास्थळीच गौस अकबर शेख (वय ३९) व अंकुश जाधव (वय ३१) यांचा मृत्यू झाला. तर उर्वरीत चौघा जखमींना उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे आणले असता त्यांची अवस्था पाहून पुढील उपचारासाठी आदिलाबादला पाठविले. यावेळी रस्त्यातच शेख कलीम (वय ३०) व शेख साहील शेख गौस (वय सहा) यांचा मृत्यू झाला. हसीनाबी (वय २६) व गणेश चव्हाण (वय ३०) हे गंभीर जखमी आदिलाबाद (तेलंगाणा) येथे उपचारार्थ दाखल आहेत. या प्रकरणी पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार कांबळे, जमादार बाळासाहेब पांढरे व होमगार्ड सय्यद फेरोज अलम अधिक तपास करीत आहेत.


विवाहितेला जिवे मारण्याचा प्रयत्न
नांदेड ः तू पसंद नाहीस, तू काळी आहेस, माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये, आंबुलगा येथील दोन एकर जमीन नावावर करून दे तरच नांदवतो असे म्हणून सासरकडील मंडळींनी विवाहितेचा छळ केला. शिवाय अंगावर पेट्रोल टाकून जिवे मारण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी २४ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून मुक्रमाबाद पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक श्री. वाघमारे पुढील तपास करत आहेत.


शिवाजीनगर भागात चोरी
नांदेड ः आंबेडकरनगर येथील केवळाबाई श्रीपत ढेंबरे घराचा दरवाजा न लावताच गडबडीमध्ये मुलीच्या घरी वाढदिवसानिमित्त गेली. उशीर झाल्यामुळे त्या मुलीकडेच मुक्कामी थांबल्या. त्या रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडा बघून पेटीतील एक तोळा सोन्याचे मनी (किंमत २० हजार रुपये), रोख २० हजार असे एकूण ४० हजार रुपये चोरून नेले. केवळाबाई ढेंबरे यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस हेडकॉन्स्टेबल श्री. कानगुलवार पुढील तपास करत आहेत.


तीन दुचाकी चोरीला
ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत दत्तनगर हडको येथून हिरो होंडा स्प्लेंडर प्लस कंपनीची दुचाकी (एमएच-२६, एयू-६३४४, किंमत २५ हजार), बालाजी लक्ष्मण सूर्यवंशी यांची दुचाकी (एमएच-२६, बीएफ ९८३८, किंमत-३० हजार) आणि लक्ष्मण एकनाथराव जोगदंड यांची होंडा शाईन कंपनीची दुचाकी (एमएच-२६, एव्ही २६२५, किंमत ३५ हजार) अशा एकूण ९० हजार रुपयांच्या दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळवल्या. सुनील शिंदे यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक श्री. बोदेमवाड अधिक तपास करत आहेत.


वाहनचालकाची आत्महत्या
नांदेड ः मौजे मार्कंड शिवार (ता.नांदेड) येथे गजानन यशवंत येवले (वय २२) या वाहनचालकाने अज्ञात कारणावरून शेतामध्ये लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. यशवंत नागोराव येवले यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक श्री. गीते पुढील तपास करत आहेत. 

संपादन - स्वप्निल गायकवाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com