अर्धापुरात चना डाळीला फुटले पाय

लक्ष्मिकांत मुळे
Saturday, 22 August 2020


कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व केंद्र सरकार राज्यातील अन्नसुरक्षा योजनेचे लाभार्थी व अंत्योदय योजनेचे लाभार्थ्यांना दर महिन्याला एका कार्डधारकांना एक किलो तूर किंवा चना डाळ मोफत देण्याची घोषणा केली होती. फक्त एप्रिल व मे महिन्यात मोफत डाळीचे वाटप झाले. त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांपासून मोफत डाळीचे वाटप झाले नाही.

अर्धापूर, (जि. नांदेड) ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिधापत्रिकाधारकांना मोफत दाळ वाटपात अनियमितता झाल्याच्या तक्रारी लाभधारक करीत आहेत. तर पुरवठा विभाग तीन महिन्यांची डाळ रास्तभाव दुकानधारकांना वाटपासाठी दिला होती असे सांगत आहेत. शहरातील व तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना गेल्या तीन महिन्यांपासून मोफत तूर, चना डाळीचे वाटप झाले नाही. गौरी लक्ष्मीच्या सणाला तरी मोफत डाळीचे वाटप करावे अशी मागणी लाभार्थी करत आहेत. याकडे पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मोफत डाळीचे वाटप झाले नाही
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व केंद्र सरकार राज्यातील अन्नसुरक्षा योजनेचे लाभार्थी व अंत्योदय योजनेचे लाभार्थ्यांना दर महिन्याला एका कार्डधारकांना एक किलो तूर किंवा चना डाळ मोफत देण्याची घोषणा केली होती. फक्त एप्रिल व मे महिन्यात मोफत डाळीचे वाटप झाले. त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांपासून मोफत डाळीचे वाटप झाले नाही.

 

हेही वाचा -  नांदेडला लोकप्रतिनिधींनी केली बाप्पाची प्रतिष्ठापना

मोफत डाळ गेली कुठे 
मोफत डाळीच्या वाटपाच्या निर्णयाप्रमाणे एक किलो तूर डाळ व दोन किलो चना डाळ तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी प्राप्त झाली. तूर डाळीचे वाटप झाले. शहरासह तालुक्यातील काही रास्तभावधारकांनी दोन किलो चना डाळ वाटप न करता एक किलोच चना डाळ वाटप केल्याच्या तक्रारी लाभधारक करीत आहेत. याप्रकरणी पुरवठा विभागाकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले, की आम्ही तीन महिन्यांच्या मोफत डाळीचे वाटप स्वस्त धान्य दुकानदाराकडे केले आहे. तर लाभार्थी म्हणतात, की आम्हाला दोनच महिने मोफत दाळ भेटली आहे. एका महिन्याची मोफत डाळ गेली कुठे अशी चर्चा शिधापत्रिकाधारकांत आहे.

चौकशी करून कार्यवाही
मोफत तूर व चना डाळ ही एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांची दुकानदारांना देण्यात आली आहे. जुलै व ऑगस्ट महिन्याची मोफत डाळ उपलब्ध झाली नाही. आल्यानंतर देण्यात येईल. ज्या स्वस्त धान्य दुकानदारांनी तीन महिन्यांची मोफत डाळ वाटप केली नाही, त्यांची चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल असे डी.एन. जाधव, पुरवठा अधिकारी यांनी सांगितले.

सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यास लुटले
शहरातील सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यास आसना नदीच्या पुलाजवळ डोळ्यात मिर्ची पूड टाकून व धारदार शस्त्रांनी मारहाण करून लुटण्याची घटना शुक्रवारी (ता.२१) रात्री झाली आहे. या लुटमारीत अज्ञात तीन चोरट्यांनी पावणेसहा लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की अर्धापूर शहरातील सराफा बाजारात नंदकुमार लोलगे यांचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. त्यांनी शुक्रवारी दिवसभर व्यापार करून सायंकाळी आपल्या स्कुटीवरून (एमएच-२६, बीए-१५४३) नांदेडला निघाले. त्यांची स्कुटी आसना पुलाजवळील दशमेश पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर आली असता, दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी आडवली. नंदकुमार यांच्या डोळ्यात मिर्ची पूड टाकून धारदार शस्त्रांनी मारहाण केली; तसेच स्कुटीच्या डिकीची किल्ली हिसकावून घेऊन डिकीतील पावणेसहा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी नंदकुमार लोलगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन चोरट्यांविरुद्ध अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free Pulses Have Not Been Distributed For Three Months, Nanded News