धर्माबादला आता बोगस बियाणांचा विळखा

dhramaba.jpg
dhramaba.jpg


धर्माबाद, (जि. नांदेड) : खरीप हंगामाची पूर्व तयारी म्हणून शेतकऱ्यांनी घाई गडबडीत धर्माबादेतील जवळच्या कृषी केंद्रांमधून विविध कंपन्यांचे बियाणे व खताची खरेदी मोठ्या प्रमाणात केली आहे. शेतात पेरणीनंतर सोयाबीनच्या ईगल बीज कंपनीसह अनेक कंपन्यांच्या बियाणांची उगवण क्षमता कमी असल्यामुळे ती उगवलीच नसल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. यामुळे आर्थिक भूर्दंड व दुबार पेरणीची समस्या त्यांना भेडसावत आहे. 


देशात कोरोनामुळे हाहाकार उडाला. देश लॉकडाउनमुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. यातून सावरत सर्वसामान्य गरजू शेतकऱ्यांनी उधारी व उसणवारी करून खरीप हंगामाच्या पेरणीसाठी कशी तरी तजवीज केली. एवढे केल्यानंतरही शेतात पेरणी केलेले बियाणे उगवलेच नाही. शेतकरी आर्थिक कुचंबणेसोबतच बनावट माल बनविणाऱ्या बियाणे व खते कंपन्यांच्या जाचामुळे त्रस्त आहे. एकीकडे शेतकऱ्यांची अशा प्रकारे हेळसांड होत असताना दुसरीकडे अशा वेळी कोणत्याही संघटनेचे अथवा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यावर आवाज उठविण्यास तयार नसल्याचे दिसून येते.

बाळापूर, चिकना, पाटोदा, नायगाव यासह तालुक्यातील अनेक भागातील शेतकरी संजय बंटी पाटील बाळापूरकर, दत्ताराम कदम, शिवराम साखरे, शंकर कदम, मारोती समसते, तेजराव जाधव, पुंडलिक समसते, देविदास कदम, हिरामण जाधव, शिवाजी जाधव, गंगाधर साखरे, हनुमंत जाधव यांच्यासह जवळपास ४० शेतकऱ्यांच्या तक्रारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्राप्त झाल्या. त्यावरून चोवीस तासात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी एम. सोनटक्के देगलूर, तालुका कृषी अधिकारी माधुरी उदावंत यांनी प्रत्यक्षात तालुक्यातील शिवार पाहणी करून वरिष्ठांना अहवाल सादर करीत आहेत. यावेळी कृषी विज्ञान केंद्र सगरोळीचे कपिल इंगळे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी विश्वास आधापुरे, महाबीज प्रतिनिधी सोनटक्के, कृषी सेवा केंद्र प्रतिनिधी के. कामीनवार, कृषी सहायक एस. पी. लखमोड, आर. एच. सुरकुंटवार आदी उपस्थित होते.

कृषी विभाग आता शेतकऱ्यांच्या बांधावर
जूनच्या सुरवातीपासूनच शेतकरी खरीप हंगामाची तयारी करीत असतो. पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक असतांना कृषी सहायक मात्र बिनधास्त उंटावरून शेळ्या राखण्याचे काम करीत होते. यामुळेच शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढवली आहे, असा आरोप छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष शिवराज पाटील चोळाखेकर यांनी केला आहे. एकीकडे बनावट बियाणांमुळे शेतकऱ्यांना कोणताही फायदा होत नसताना आणि त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत असताना जिल्हा कृषी विभागाने तयार केलेली शोधमोहीम पथक आणि तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नेमके करतात काय? हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. ‘सकाळ’च्या दणक्याने काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील ईनानी फर्टिलायझर्सवर बोगस बियाणे विक्री प्रकरणी एक महिन्यासाठी बियाणे परवाना निलंबित करण्यात आला हे विशेष.


तक्रारीच्या अनुषंगाने तालुक्यात पंचनाम्याची प्रक्रिया चालू आहे. चोवीस तासांच्या आत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसह तालुका कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत आहेत. ज्यांची पेरणी झाली नाही अशा शेतकऱ्यांना दुकानदार बियाणांच्या बॅगा बदलून देत आहेत. त्यांच्या स्तरावरून ते निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठलीही अडचण येणार नाही.
- विश्वास आधापुरे, पंचायत समिती कृषी अधिकारी, धर्माबाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com