Nanded News | पीक कर्जात वाढ करून एमटी लोनसाठी निधी द्यावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड : पीक कर्जात वाढ करून एमटी लोनसाठी निधी द्यावा

नांदेड : पीक कर्जात वाढ करून एमटी लोनसाठी निधी द्यावा

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ‘अ’ दर्जा प्राप्त करण्यासाठी राज्य सरकारने विविध सुविधा द्याव्यात, तसेच शेती अवजारांसाठी एमटी लोन उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीक कर्जात वाढ करावी, अशी मागणी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी खासदार शरद पवार यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्रातील जिल्हा बँकांची माजी मंत्री खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकतीच राज्य सहकारी बँकेच्या पुढाकारातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, सहकारी खात्याचे आयुक्त कौडे, राज्य सहकारी बँकेचे सीईओ अजित देशमुख, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम व जिल्हा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत नांदेडच्या बँकेचे उपाध्यक्ष भोसीकर यांनी विविध बाबींची मागणी केली. त्यामध्ये जिल्हा बँकेला अनिष्ठ तफावत ५२.१८ कोटी असून ते दूर करण्यासाठी वैद्यनाथच्या धर्तीवर सरकारने पॅकेज द्यावे, सन २०१८ ते २०१९ पासून पीक कर्जावरील मिळणारे शासनाचे अनुदान जे की १९ कोटी आहे ते त्वरीत द्यावे, राज्य सहकारी बँकेने व शासनाने नांदेड जिल्हा बँकेला ‘अ’ दर्जामध्ये आणण्यासाठी विविध सुविधा द्याव्यात, त्यामध्ये विद्युत बिल भरण्याची परवानगी, राज्य कर्मचाऱ्यांचा पगार जिल्हा बँकेतून करावा, राज्य सहकारी बँकेतून चालणारे सर्व व्यवहार जिल्हा बँकेच्या माध्यमातून करण्याची सुविधा द्यावी तसेच इतर व्यवहार करण्यासाठी परवानगी द्यावी, शेतकऱ्यांना दिले जाणाऱ्या पीक कर्जाची रक्कम वाढवावी, बिगर शेती एनपीएची अट शिथिल करावी, एमटी लोन उपलब्ध करून द्यावे, शेतीचे अवजारे त्यामध्ये ट्रॅक्टर, इलेक्ट्रॉनिक्स मोटार व इतर साहित्य खरेदीसाठी परवानगी द्यावी. यासह विविध स्वरूपाच्या मागण्या खासदार शरद पवार यांच्याकडे व राज्य शासनाकडे उपाध्यक्ष भोसीकर यांनी केल्या आहेत.