Temperature : भावी पिढ्यांना सं‘ताप’! सहा वर्षांत पारा जाऊ शकतो ५० अंशांवर!

उष्णतेची लाट अभ्यासताना केवळ तापमान वाढ किती होत आहे, इतकेच बघून जमणार नाही तर शरीर थंड व्हायला किती वेळ लागतो हे बघावे लागते.
temperature
temperaturesakal

नांदेड - मागील आठवडाभरापासून नांदेडचे तापमान चाळिशीपुढे आहे. हे केवळ आपल्या शहरातच झाले असे नाही; तर गाव, खेडी, तांडे, वाडी, वस्त्या अशा प्रत्येक ठिकाणी तापमान वाढ ही ज्वलंत समस्या झाली; पण हे का होते, ते टाळावे कसे, याकडे सुज्ञ नागरिक म्हणून ना आपण गांभीर्याने पाहतो, ना प्रशासन-शासन ठोस उपाय करते. परिणामी, दरवर्षी तापमान वाढत आहे. हे असेच चालू राहिले तर येणाऱ्या पिढ्यांनाही वारसा म्हणून ‘ताप’ देऊ; तेव्हा ते आपल्यावर ‘संताप’ व्यक्त करतील, हे निश्चित.

उष्णतेची लाट अभ्यासताना केवळ तापमान वाढ किती होत आहे, इतकेच बघून जमणार नाही तर शरीर थंड व्हायला किती वेळ लागतो हे बघावे लागते. सध्या उष्णतेसोबतच सापेक्ष आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा बसतात. ही दमट उष्णतेची लाट असून, इथून पुढे तापमान वाढ होत जाईल. सध्या उष्मा निर्देशांक ४० ते ४८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान जाणवतो. २०३० पर्यंत ५० अंश सेल्सिअस सरासरी तापमान वाढ होत जाईल, असा अंदाज पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केला.  

जागतिक हवामान बदलाचे स्थानिक परिणाम अभ्यासताना गेल्या ११ वर्षांपासून उष्णतेमध्ये वाढ होत आहे. दरवर्षी गेल्या वर्षीपेक्षा जास्त उष्णता असते. उष्माघाताचे बळी हेसुद्धा याच बदलत्या हवामान बदलाचे बळी ठरतात. दुर्दैवाने या घटनांमध्ये बहुतांश कष्टकरी असतात. मात्र, उष्माघाताने मृत्यू झाला, अशी सरकारी नोंद केली जात नाही.

भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषदेच्या सदस्य आणि सरस्वती भुलन महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. क्षमा खोब्रागडे यांनी तापमान वाढीची वेगवेगळी कारणे नमूद केली. जुन्या वाहनांचा वापर, शहरात मोठ्या प्रमाणात असणारी वाहने, वाढत्या लोकसंख्येला अपेक्षित झाड नसणे, काँक्रीटीकरण, औद्योगिकीकरण, कचरा जाळणे अशी वेगवेगळी घटक एकत्रित येऊन तापमान वाढ करत आहे.

या समस्यांवर वर्षांनुवर्षे ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने हवेत उष्णता धरून ठेवण्याचे प्रमाण वाढले. सिमेंटच्या रस्त्यांनी जमिनीत पाणी मुरत नाही. पाणी धरून ठेवण्याचा जमिनीचा गुणधर्म नाहीसा होत असून पाणी झपाट्याने वाहून जाते. मातीची सच्छिद्रता कमी झाली आहे.दुर्दैवाने इतक्या गंभीर विषयावर चर्चा करणारे, काम करणारे लोकप्रतिनिधी नाही. आम्ही आमच्या पूर्वजांची  पर्यावरणपूरक जीवनशैली कालबाह्य केल्याने तापमान वाढ होत असल्याचे निरीक्षण क्षमा खोब्रागडे यांनी नोंदवले.

उष्माघाताचे गांभीर्य नाही

तापमान आणि आर्द्रतेचा एकत्रित परिणाम दर्शवणारा ‘उष्मा निर्देशांक’ (हिट इंडेक्स) धोकादायक पातळीत असताना दीर्घकाळ सूर्यप्रकाशात राहिल्याने अनेकांना उष्माघाताचा त्रास होतो. पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यावर शरीर थंड करायला शरीरातून पाणी बाहेर पडत. सोडियम, पोटॅशिअम, इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडतात. हे प्रमाण अधिक झाले तर रक्तवाहिन्या फुगतात किंवा रक्ताच्या गाठी होऊ शकतात.

यामुळे ब्रेन स्ट्रोक किंवा तीव्र हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. आपली व्यवस्था आपत्ती आल्यानंतर कामाला लागते. उष्माघाताचे विखुरलेले असतात. वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांचा मृत्यू झाला अशी नोंद होते. थेट उष्माघाताने मृत्यू झाला अशी सरकारी नोंद होत नाही. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेने यावर काम करायला हवे. ‘आपात्कालीन’ परिस्थितीपेक्षा आपण ‘आपत्तीपूर्व’ कामाला लागलो तर नुकसान व मनुष्यहानी टाळता येऊ शकते.

हीट इंडेक्सची अशी होते मोजणी

तापमान आणि आर्द्रतेचा एकत्रित परिणाम दर्शवणारा ‘उष्मा निर्देशांक’ (हिट इंडेक्स) धोकादायक पातळीत असताना दीर्घकाळ सूर्यप्रकाशात राहिल्याने अनेकांना उष्माघाताचा त्रास झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कार्यक्रम सुरू असताना मुंबई आणि लगतच्या क्षेत्रात उष्मा निर्देशांक ४० ते ४८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता, असे आकडेवारी सांगते कमाल तापमान आणि सापेक्ष आर्द्रता या दोन घटकांना गृहित धरून एका सूत्राद्वारे उष्मा निर्देशांक (हिट इंडेक्स) मोजला जातो.

वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यास हवेच्या प्रत्यक्ष तापमानापेक्षा शरीराला जाणवणारे तापमान जास्त असते. हवेत आर्द्रता जास्त असल्यास शरीरातून घाम बाहेर पडण्याची प्रक्रिया मंदावते. घाम कमी आल्यामुळे शरीराचे तापमान वाढत जाऊन उष्माघाताचा त्रास होतो.

उन्हाळा तीव्रपणे जाणवतो असून असह्य होतोय. ग्रीन हाऊस गँसेसचे प्रमाण वाढल्याने तापमान वाढ होत आहे. ४ मे रोजी नांदेड संपूर्ण भारतातील सर्वाधिक उष्ण जिल्हा होता. हे संकट मानवाला धोक्याची घंटा असून, जैवविविधतेवर परिणाम होतोय. आपण अजूनही याचे गांभीर्य ओळखले नाही तर वातावरण बदलांना सामोरे जाताना आपण वेगाने वाळवंटीकरणाच्या प्रक्रियेला सामोरे जातोय, हे वास्तव आहे. स्थानिक यंत्रणांनी हे समजून घ्यायला हवे.

- डॉ. क्षमा खोब्रागडे, सदस्य भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद, नवी दिल्ली

‘उष्माघाताचे बळी’ अशी थेट सरकारी नोंद झाल्याशिवाय प्रतिबंधात्मक उपाय केले जाणार नाहीत. स्थानिक स्तरावर हवामान बदलांच्या अनेक घटनांची नोंद हवी. उष्णतेची तीव्र लाट असून, येत्या दिवसांत तापमान अजून वाढेल. अशा परिस्थितीत उष्माघाताचे बळी ठरू शकतात. ही शक्यता लक्षात घेऊन लोकांना तीव्र उन्हापासून बचाव कसा करावा याविषयी स्थानिक स्वराज्य संस्थानी लोकांना वारंवार सूचना देणे, मदत करणे आवश्यक आहे. वैद्यकीय महाविद्यालय आणि पत्रकार संघ यांनीही या विषयावर एकत्र काम करावे.

- अतुल देऊळगावकर, पर्यावरण अभ्यासक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com