गणेशमूर्ती कारागिरांमध्ये अस्वस्थता वाढली...काय आहे कारण? वाचा... 

शिवचरण वावळे
Thursday, 6 August 2020

श्री गणेशाची मूर्ती घडवणारा कारागीर वर्ग हा पारंपारिक पद्धतीने चालत आलेल्या वडीलोपार्जित व्यवसायात गुंतलेला आहे. त्यामुळे या व्यवसायात घरातील लहान मोठ्यांचा सहभाग असतो. मात्र कोरोनामुळे गणपतीची मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांवर चांगलेच संकट ओढवले आहे. यात शासनाने घातलेल्या नियम व अटींमुळे मुर्ती कारागिरांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे दिसून येते. 

नांदेड - जिल्ह्यात लहान मोठे असे साडेतीनशेच्या जवळपास मूर्ती कारागीर आहेत. त्यांच्याकडे पुरेशे भांडवल नसले तरी, बँकेचे कर्ज किंवा कुणाकडून हातउसने पैसे घेऊन त्यांनी या व्यवसायात गुंतवणूक केली आहे. तयार गणेश मूर्तीच्या विक्रीतून आलेल्या पैशातून लोकांचे देणे फेडणे असा हा त्यांचा दरवर्षीचा व्यवसाय असतो. परंतू यावर्षी कोरोना महामारीचे संकट आल्याने शासनाने देखील मूर्तीच्या उंचीवरच बंदी घातल्याने मूर्ती कारागिरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

जिल्ह्यातील लहान मोठ्या मूर्ती कारखान्यात वर्षाला तीन हजार गणेश मूर्तींची निर्मिती होते. एक फुटापासून ते बारा फुटापर्यंत मूर्तीं असते. त्यासाठी लागणारा कच्चा माल पीओपी राजस्थान, रंग मुंबई तर यासाठी लागणारा काथ्या तेलंगणा, श्रीशैलम, हैदराबाद या शहरातून मागवावा लागतो. परंतू मागील पाच महिन्यापासून लॉकडाउन असल्यामुळे लागणारे साहित्य मिळण्यात अडचणी येत असल्या तरी ज्या कारागिरांनी नेहमीप्रमाणे गणेश मंडळाच्या मागणीनुसार नोव्हेंबरपासून काम सुरु केले होते. त्या मूर्ती कारागिरांच्या कारखान्यात गणपतीच्या एक फुटापासून ते दहा फुटापर्यंत हजारो श्री मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.
 
हेही वाचा- अठराविश्वे दारिद्र्यातून केले यशाचे शिखर सर

पाच ते बारा फुटांच्या श्री गणेशाच्या मूर्तींचे करायचे काय? 

मात्र, देशावर कोरोनाच्या संकट आल्याने शासनाने घरगुती श्री गणेश मूर्तीची उंची एक ते दोन फुट तर सार्वजनिक गणेश मंडळाने केवळ चार फुटापर्यंतच्या गणेश मूर्तीची स्थापना करावी, अशी अट घातली आहे. याशिवाय जानेवारी २०२१ पासून प्लास्टर आॅफ पॅरीस (पीओपी) वर बंदी घातली आहे. त्यामुळे कर्ज काढून तयार केलेल्या श्री गणेशाच्या पाच ते बारा फुटांच्या मूर्तींचे करायचे काय? असा प्रश्‍न मूर्ती कारागिरांना पडला आहे. 

अन्यथा मूर्ती कारागिरांचाना नुकसान भरपाई दिली जावी
कोरोना महामारीमुळे मूर्ती कारागिरावर ओढवलेले संकट वर्षभर तरी जाणार नाही. सध्या एक ते दहा फुटापर्यंतच्या गणेश मूर्ती तयार आहेत. मात्र, मोठ्या मूर्तीची स्थापना करण्यास शासनाने बंदी घातली आहे. तेव्हा शासनाने तयार असलेल्या मूर्ती विक्रीची परवानगी द्यावी. अन्यथा मूर्ती कारागिरांचा सर्व्हे करुन त्यांना नुकसान भरपाई दिली जावी. दीड हजार कारागिरांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न आहे. शासनाने याचा पुनर्विचार करावा. 
- गजेंद्र ठाकूर, अध्यक्ष, श्री गणपती मूर्ती कारागीर संघटना, नांदेड. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshmurti artisans uneasy What Is The Reason Read Nanded News