घोरबांड कुटुंबिय बनवताहेत इकोफ्रेंडली गणपती, कशापासून? ते वाचाच

प्रमोद चौधरी
Tuesday, 18 August 2020

पोखरभोसी (ता.लोहा) येथील गोशाळेमध्ये गावरान गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गणेशमूर्त्यांना नांदेडसह इतर जिल्ह्यांतूनही मागणी येत आहे. मात्र, मर्यादा असल्यामुळे ही मागणी पूर्ण होवू शकत नसल्याचे प्रल्हाद घोरबांड यांनी सांगितले.  

नांदेड : प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तीमुळे पर्यावरणाला मोठा धोका आहे. त्यामुळे अलिकडे शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याकडे कल वाढलेला आहे. परंतु, त्याहीपलिकडे जावून आता नांदेडमध्ये गाईच्या शेणापासून तसेच मलमूत्रापासून गणेशमूर्ती तयार करण्याचे काम घोरबांड कुटुंबिय करत आहे. 

‘पर्यावरण बचाव व स्वावलंबी गोशाळा’ या अभियानातून गावरान गाईच्या शेणापासुन ‘गोमय गणेश मुर्ती’ साकारण्याचे काम "श्रीकृष्ण गोशाळा, पोखरभोसी (ता.लोहा) येथे सुरु आहे. नांदेडभुषण डॉ. बाळासाहेब साजने यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली या गोशाळेत कुपोषीत, म्हातारा, अपंग व देवाला सोडलेल्या अशा एकूण ११३ गोवंश आहेत. नांदेडचा गुजराती समाज, जैन समाज, माहेश्वरी समाज, प.पू.सिंधी समाज आदींच्या लोकसहभागातून ही गोशाळा चालविली जाते.  

हेही वाचा - नांदेड मनपा क्षेत्रात केल्या दहा हजार अॅंटिजेन तपासण्या
 

गोशाळा आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न
गोशाळा आत्मनिर्भर व्हावी व गाईला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होऊन गावरानी गाईंच्या रक्षणाबरोबर रोजगार निर्मिती व प्लास्टर अॉफ पॅरीसला मुक्ती देऊन पर्यावरणपूरक वस्तुंचा वापर वाढावा म्हणून या गणेशमूर्ती तयार करून विकल्या जात आहेत. गेल्या वर्षी गणेशोत्सवादरम्यान १५ गोमय गणेशमुर्ती बनवल्या होत्या. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे वाढती मागणी लक्षात घेऊन यावर्षी ८०० ते ९०० गणेशमूर्त्या बनविल्या आहेत. परंतु, कोरोनाच्या थैमानामुळे आरोग्य विभागाच्या सुचना पाळुन अनेकांच्या मागण्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत.   

हे देखील वाचाच - शोषितांसाठी झटणाऱ्या सुनिल ईरावारने जीवनयात्रा संपवली, काय आहे कारण? वाचा

काय आहे या मूर्त्यांचे वैशिष्ट्य
घोरबांड कुटुंबियांनी मुर्त्या शंभर टक्के गावरान गाईचे शेण व खाद्यरंग, चुना, आष्टगंध,आबीरबुका यांचा वापर करुन बनवल्या आहेत. मुर्तींचे विसर्जन घरीच बादलीत पाणी घेऊन करता येते. हे पाणी आठ दिवसानंर अंगणातील तुळस व इतर वृक्षांना टाकल्यास त्यांना संजीवनी ठरेल. शिवाय गोदावरीत किंवा इतर जलाशयात विसर्जित केल्यास अनेक जलचरांना खाद्य, नदीकिना-यावरील झाडांना खत व जल शुध्दीकरणासाठी फायद्याचे ठरणार आहे.  

मागणी पूर्ण होवू शकली नाही
पूर्वनोंदणी करुनच मुर्तींची निर्मिती केल्यामुळे मार्केटींगची समस्या राहिली नाही. आजही अनेक पर्यावरणप्रेमी व गोभक्तांकडून मागणी सुरुच असून, स्टॉक नसल्याने ती पूर्ण करू शकत नाही. परभणी, उमरखेड, पुसद आदी जिल्ह्यातुनही गोमय गणेश मुर्तींची मागणी जोर धरत आहे.  
- प्रल्हाद घोरबांड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghorband Family Is Making Eco-Friendly Ganpati Nanded News