अठराविश्वे दारिद्र्यातून केले यशाचे शिखर सर

jpg.jpg
jpg.jpg

कंधार, (जि. नांदेड)ः कलेक्टर व्हायचेच असे ध्येय समोर ठेवून त्यासाठी परिश्रमाची पराकाष्ठा करीत दिग्रस बुद्रुक (ता. कंधार) येथील माधव विठ्ठल गिते यांनी यूपीएससीत देशात २१० वी रँक मिळवली. मागच्या वर्षी गिते यांनी यूपीएससीत ५६७ वी रँक मिळवली होती. कलेक्टर होण्यासाठी ते यश पुरेसे नसल्याने त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि त्याला मुलामा चढवत त्यांनी यावर्षी आपले स्वप्न साकार केले.


घरची परिस्थिती बेताची
माधव गिते तालुक्यातील दिग्रस बुद्रुक या गावचे रहिवासी. घरची परिस्थिती बेताची. आईचे छत्र लहानपणी हरवलेले. वडील विठ्ठल गिते मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण दिग्रस येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये घेतले. जळकोट येथे ११ व १२ वी केले. बारावी पादाक्रांत करेपर्यंत त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. घरची स्थिती हलाखीची असल्याने त्यांनी ११-१२ वी करताना रोजंदारीवर कामे केली. अठरविश्वे दारिद्र्याला छेद देण्याचा संकल्प करून त्यांनी कंधार सोडले.


कोणत्याही परिस्थितीत यूपीएससीचे शिखर सर करायचेच
त्यानंतर त्यांनी पुण्यात पॉलिटेक्निक करून इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून त्यांची पुण्यातील नामवंत कंपनीत नेमणूक झाली. या कंपनीत त्यांनी तीन वर्षे नोकरी केली. परंतु त्यांचे मन रमले नाही. नोकरी करीत त्यांनी दोनवेळा यूपीएससी परीक्षा दिली. पण, त्यांना यश मिळाले नाही. कोणत्याही परिस्थितीत यूपीएससीचे शिखर सर करायचेच, असा निर्धार त्यांनी मित्रांजवळ बोलून दाखवला. मित्रांकडून अर्थसाहाय्य प्राप्त होताच त्यांनी दिल्ली गाठली. येथे येऊन त्यांनी पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले आणि तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी यशाला गवसणी घातली होती.

मागच्या वर्षी त्यांनी यूपीएससीमध्ये यश मिळवले खरे मात्र त्यांचे समाधान झाले नाही. कलेक्टर होण्याची जिज्ञासा बाळगून त्यांनी सिमला येथे इंडियन अकाउंटंट सर्व्हिसमध्ये ट्रेनिंग करीत पुन्हा अभ्यासात स्वतःला झोकून दिले. कुशाग्र बुद्धिमत्ता, ध्येयाचा ध्यास, त्यासाठी केलेले परिश्रम कामी आले. जिद्द, ध्यास आणि परिश्रम ज्यांच्या अंगी असते ते कधीच अयशस्वी होत नाहीत. माधव गिते यांच्या बाबतीतही हेच घडले. त्यांनी अखेर करून दाखवलेच. यंदा त्यांनी २१० वी रँक मिळवली. पंखांत बळ असेल तर कितीही उंच भरारी मारता येते, हे त्यांच्या यशातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

ग्रामीण भागात गुणवत्ता ठासून भरलेली असते. परंतु त्याचा योग्यप्रकारे वापर करण्यात आपण कमी पडतो. ग्रामीण, आर्थिक स्थिती असे काही नसते. ध्येय महत्त्वाचे असते. माझ्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. काम केल्याशिवाय पोट भरत नव्हते. अशा परिस्थितीतही मी शिक्षणाची कास सोडली नव्हती. ध्येयाचा ध्यास केला की यश हमखास मिळतेच. ग्रामीण भागातील तरुणांनी कोणत्याच प्रकारचा न्यूनगंड बाळगू नये. चिंता कोणतीही असो, त्याचा मुकाबला करून मार्गक्रमण करण्याची गरज आहे.
- माधव गिते. 

शब्दांकन - स्वप्निल गायकवाड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com