esakal | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजाराची मदत द्या- माजी आमदार वसंतराव चव्हाण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जोरदार पावसामुळे सोयाबीनसह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन एकरी २५ हजाराची शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजाराची मदत द्या- माजी आमदार वसंतराव चव्हाण

sakal_logo
By
प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव  (जिल्हा नांदेड) : एकीकडे पावसाने १५ ते २० दडी मारल्याने पिके धोक्यात आली असतांनाच दुसरीकडे मागच्या चार दिवसांत वादळी वारे,  विजेच्या गडगडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे सोयाबीनसह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन एकरी २५ हजाराची शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे. 

 नायगाव मतदारसंघातील नायगावसह उमरी व धर्माबाद तालुक्यात मागच्या चार पाच दिवसापासून विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने  झोडपून काढल्याने मतदारसंघातील सोयाबीन, कापूस, ज्वारी सह अन्य पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला असून काढणीला आलेले पिक मातीत गेले आहे. मागील १५ ते २० दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मागच्या चार पाच दिवसापुर्वी दिलासादायक सुरुवात कूली होती. मात्र काही ठिकाणी वादळी वारे व विजेच्या गडगडाटासह पावसाने अक्षरशः दोडपले. त्यामुळे पिके पाण्याअभावी धोक्यात आलेली पिके पावसामुळे मातीमोल झाली आहेत. सोयाबीन, कापूस, ज्वारीसह तुरीच्या पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या पिकात पाणी असल्याने पिकाची काढणी करताना पिके मुळासकट उपटून येत आहेत. 

शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे

 नायगांव मतदार संघातील नायगांव, उमरी, धर्माबाद तालुक्यात ता. १७ सप्टेंबर पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीमधील ऊभ्या असलेल्या सोयाबीन पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. यापुर्वी ऊडीद, मुग या पिकाचे नुकसान झाले असतांना त्या सोबत सोयाबीन पिक उत्पादन हे शेतकऱ्यांच्या कौटूंबीक अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे. त्यामुळे खरीप हंगामातील या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन शासनामार्फत शेतकऱ्यांना प्रति एकरी २५ हजार रुपये अनुदान मिळवुन देण्यात यावी अशी माहिती माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचेकडे केली आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयाने पंचनामे करुन शेतकऱ्यांना अर्थिक मदत मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल करावा अशी विनंती केली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे