गुड न्यूज : नांदेडला लवकरच वनउद्यान आणि वनसरंक्षक कार्यालय- वनमंत्री संजय राठोड

प्रल्हाद कांबळे
Thursday, 24 December 2020

त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्याच्या सूचना वनमंत्री संजय राठोड यांनी दिल्या आहेत. खासदार हेमंत पाटील यांनी याबाबत वारंवार पाठपुरावा करुन वनउद्यान आणि कार्यालयाची मागणी केली होती.

नांदेड : नांदेड विभागात मोठ्या प्रमाणात वनसंपदा असल्याने औरंगाबाद येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाप्रमाणेच नांदेड विभागासाठी मुख्य वनसंरक्षक कार्यालयास मान्यता देण्यात आली असून, त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्याच्या सूचना वनमंत्री संजय राठोड यांनी दिल्या आहेत.

हिंगोली लोकसभा मतदार संघात किनवट आणि माहूर तसेच इतर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असून त्याठिकाणी पर्यटनासाठी वनउद्यान मंजूर करावेत आणि नांदेड, हिंगोली, लातूर, परभणी या जिल्ह्यात असलेल्या मोठ्या प्रमाणात वनसंपदेचा विस्तार लक्षात घेता नांदेड विभागासाठी नांदेड येथे मुख्य वनसंरक्षक कार्यालय मंजूर करण्यात यावेत अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे केल्यांनतर या मागणीला वनमंत्री संजय राठोड यांनी तत्वतः मंजूरी दिली. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील व विभागातील लगतच्या जिल्ह्यातील वनविभागातील कामांना गती देण्यासाठी नांदेड येथे स्वतंत्र मुख्य वनसंरक्षक कार्यालय मंजूर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. बुधवारी (ता. २३) सकाळी आढावा बैठकीसाठी आल्यानंतर त्याबाबत सविस्तर चर्चा झाली. वनमंत्री संजय राठोड यांनी यास तत्वतः मान्यता देवून ते मंजूर केले. 

हेही वाचा - नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू -

त्याची रचना व अन्य बाबीसंदर्भात शासनादेश काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे वनविभागाच्या विकासासाठी वारंवार औरंगाबादलाजाणे वाचणार आहे. नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी या चार जिल्ह्यासाठी हे कार्यालय कार्यरत असेल. यासोबतच खासदारांनी मागणी केल्यानुसार किनवटसाठी नांदेडप्रमाणेच वेगळे उपवनसंरक्षक कार्यालय विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगून या कार्यालयाचे लवकरच उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात विशेष बाब म्हणून वन उद्यान मंजूर करण्याची मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली होती. त्यानुसार हदगाव तालुक्यातील पळसा व शिवपुरी, हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी, माहूर येथील माहूर गड व किनवट तालुक्यातील राजगड येथे वन उद्यान विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पळसा ता. हदगाव येथील वन उद्यानासाठी तीन कोटी ९८ लक्ष, शिवपुरी येथील सहा कोटी १२ लक्ष, वाळकेवाडी येथील पाच कोटी २९ लक्ष, माहूर गड येथील वन उद्यानासाठी चार कोटी १५ लक्ष, राजगड येथील वन उद्यानासाठी चार कोटी सात लक्ष अशी रक्कम मंजूर करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच हिंगोली जिल्ह्यातील वन पर्यटन हिंगोली, कळमनुरी तालुक्यातील वन पर्यटन येहळेगाव (तु.), शेनगाव तालुक्यातील येलदरी, औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा नागनाथ, कळमनुरी तालुक्यातील सिदोबा परिसर, वरुड, डोंगरकडा येथील वन पर्यटन व वन उद्यानासाठीची मंजुरीही आपण देत असल्याचे त्यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good News: Forest Office and Forest Conservancy Office in Nanded soon Forest Minister Sanjay Rathore nanded news