नांदेडकरांना गुड न्यूज : विष्णुपूरी प्रकल्प तुडूंब, एक दरवाजा उघडला

प्रल्हाद कांबळे
Monday, 17 August 2020

प्रकल्प शंभर टक्के भरला असल्याने रविवारी रात्री उशिरा प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला. त्यातून 471 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

नांदेड : येथील गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये मागील तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने धरणात पाण्याचा येवा वाढला आहे. प्रकल्प तडूंब भरला असून खबरदारी म्हणून एक दरवाजा उघडण्यात आला आहे. 

प्रकल्प शंभर टक्के भरला असल्याने रविवारी रात्री उशिरा प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला. त्यातून 471 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान पूर्णा नदीपात्रातून प्रकल्पाच्या वरच्या बाजूला गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू राहिला तर सोमवारी (ता. १७) आणखी एक दरवाजा उघडावा लागण्याची शक्यता आहे. मागील ४८ तासापासून गोदावरी नदीपात्रात थोड्याफार खंडानंतर संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वरच्या बाजूला पूर्णा नदीवर असलेले येलदरी तसेच सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे या दोन्ही धरणांतून 216 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

हेही वाचा -  विष्णुपूरी प्रकल्पातील पाण्याचे योग्य नियोजन करा- खासदार हेमंत पाटील

सोमवारी (ता. १७) दरवाजा उघडण्यात येणार

पूर्णा नदीतील पाणी गोदावरी नदीत येत असल्यामुळे नांदेड येथील विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. सध्या विष्णुपुरी प्रकल्प क्षमतेपेक्षा अधिक भरला आहे. प्रकल्पातील जलसाठा 80.90 असून प्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे रविवारी (ता. १६)  उशिरा प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला होता. त्यातून 471 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. यानंतरही पूर्णा नदीवरील पाण्याचा येवा सुरूच राहिला तर सोमवार सायंकाळपर्यंत आणखी एक दरवाजा उघडा लागेल असे माहिती नांदेड पाटबंधारे उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता निळकंठ गव्हाणे यांनी दिली.

नदी काठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी

दरम्यान सततचा पाऊस आणि त्यामुळे प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत होणारी वाढ यामुळे निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी पाटबंधारे विभागातील सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे श्री. गव्हाणे यांनी सांगितले. विष्णुपुरी प्रकल्प येथील पूर नियंत्रण कक्ष तसेच आमदुरा, बळेगाव दिग्रस बंधाऱ्यावर 24 तास कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याचे श्री गव्हाणे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news to Nandedian: Vishnupuri project full, a door opened nanded news