वाहनधारकांसाठी गुड न्यूज :  सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूकीला ३० सप्टेंबरपर्यंत करमाफी 

प्रल्हाद कांबळे
Thursday, 27 August 2020

ता. एक एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी वाहन करमाफी- परिवहन मंत्री ॲड. अनिल परब 

नांदेड : कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या टाळेबंदीमुळे (लॉकडाऊन) सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक करणारे वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना ता. एक एप्रिल ते ता. ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत वाहन करमाफी देण्याबाबतचा निर्णय मंत्री मंडळ बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी दिली.

कोविड -१९ पार्श्वभूमीवर केंद्रशासनाने ता. २५ मार्चपासून संपूर्ण देशात टाळेबंदी (लॉकडाऊन) घोषित केली होती. ही टाळेबंदी ता. ३१ मेपर्यंत सुरू होती. त्यानंतर राज्य शासनाने ता. ३१ मेच्या आदेशान्वये मिशन बिगिन अगेन अंतर्गत काही प्रमाणात टाळेबंदी खुली केलेली आहे. या टाळेबंदीच्या कालावधीत सार्वजनिक वाहतूक बंद होती. त्यामुळे विविध वाहतूक संघटनांनी नुकसान भरपाई म्हणून शासनाने करमाफी द्यावी, अशी विनंती केली होती. 

सर्व कर भरणाऱ्या वाहनांची एकूण संख्या ११ लाख ४० हजार ६४१ एवढी आहे.

राज्यामध्ये वार्षिक करप्रणालीच्या वाहनांना ता. एक एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० या सहा महिन्यांच्या कालावधीत कर भरण्यापासून १०० टक्के करमाफी देण्याचा म्हणजे सन २०२० -२१ या आर्थिक वर्षासाठी एकूण वार्षिक कराच्या ५० टक्के करमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही करमाफी मालवाहतूक करणारी वाहने, पर्यटक वाहने, खोदकाम करणारी वाहने, खाजगी सेवा वाहने, व्यावसायिक कॅम्पर्स वाहने, स्कूल बसेस या वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना लागू राहणार आहे. या सर्व कर भरणाऱ्या वाहनांची एकूण संख्या ११ लाख ४० हजार ६४१ एवढी आहे. त्यामुळे राज्य शासनास सुमारे ७०० कोटी एवढा कर कमी मिळणार असल्याने राज्य शासनावर तेवढा आर्थिक भार
राहणार आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for vehicle owners: Tax exemption for public transport and freight till September 30 nanded news