esakal | नांदेड : भरधाव स्कार्पिओच्या धडकेत आजी- नातू ठार 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शेतातून घराकडे येणाऱ्या दोघांना पाठीमागून जोराची धडक दिली. यात ५० वर्षाची महीला जागीच ठार झाली तर तीन वर्षाच्या चिमुकल्याचा उपचारासाठी नेत असतांना मृत्यू झाल्याची घटना (ता. १६) रोजी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान घडली.

नांदेड : भरधाव स्कार्पिओच्या धडकेत आजी- नातू ठार 

sakal_logo
By
प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव (जिल्हा नांदेड) : गडगामार्गे नांदेडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका स्कार्पिओने कहाळ्याजवळ शेतातून घराकडे येणाऱ्या दोघांना पाठीमागून जोराची धडक दिली. यात ५० वर्षाची महीला जागीच ठार झाली तर तीन वर्षाच्या चिमुकल्याचा उपचारासाठी नेत असतांना मृत्यू झाल्याची घटना (ता. १६) रोजी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान घडली. मयत दोघे हे नात्याने आजी व नातू असल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदर प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

नायगाव तालुक्यातील कहाळा (खुर्द) येथील सासू- सुना तीन वर्षाच्या मुलाला घेवून रविवारी (ता. १६) सकाळी शेतात कामासाठी गेल्या होत्या. मात्र दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान पाऊस येत असल्याने त्या घराकडे परतत असतांना गडगा- कहाळा मार्गे नांदेडकडे भरधाव जाणाऱ्या स्कार्पिओने ( जीजे ०१/के सी ००७१) त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत अंजनाबाई दत्तात्रय कारताळे यांच्या अंगावरुन स्कार्पिओ गेली. यात त्या जागीच ठार झाल्या तर त्यांचा तीन वर्षाचा नातू नारायण बालाजी कारताळे हा गंभीर जखमी झाला.

हेही वाचा -  महावितरण : कोरोना यौध्यांचा मुख्य अभियंत्याकडून गौरव

कहाळा गावावर शोककळा

गंभीर जखमी झालेला तीन वर्षाच्या चिमूकल्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. नाकातोंडातून रक्त येत असल्याने तो वेदनेने तळमळ करत होता. पण त्याला लवकर कुणीही उपचारासाठी दाखल करण्याची माणूसकी दाखवली नाही. त्यामुळे घटनास्थळी आलेल्या प्रताप पाटील सोमठाणकया कार्यकर्त्याने जखमी अवस्थेतील चिमुकल्याला उपचारासाठी नायगावच्या रुग्णालयात घेवून गेले होते. त्याच्यावर प्राथमीक उपचार करुन परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले. पण वेळेत उपचार मिळाले नसल्याने तीन वर्षाच्या चिमुकल्याचाही जीव गेला.

चिमुरड्याचा रस्त्यात मृत्यू

ज्या स्कार्पिओने अपघात घडला त्याच गाडीत तीन वर्षाच्या नारायण कारताळे यास उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले. मात्र उपचार वेळेत मिळाले नसल्याने नांदेडमध्ये त्याची प्रणाज्योत मालवली. चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच चालकाने पळ काढला. सदर प्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात स्कॉर्पिओ चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक करीम पठाण यांनी दिली.

संपादन - प्रल्हाद कांबळे