नांदेडकरांना मोठा दिलासा : आज सोळा रुग्ण कोरोनामुक्त

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडत असली तरी, दुसरीकडे निगेटिव्ह रुग्ण संख्या देखील वाढत असल्याने समाधानतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी (ता.एक) जून महिण्याच्या पहिल्याच दिवशी १६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना परिवाराच्या स्वाधिन करण्यात आले आहे.  

नांदेड : कोरोना विषाणूची बाधा झालेल्या व जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या रुग्णालयात उपचार सुरु असलेले १६ रुग्ण कोरोनाच्या कचाट्यातून मुक्त झाल्याने सोमवारी (ता.एक) त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. पॉझिटिव्ह रुग्णांचे दुसरे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्या परिवारातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रुग्णालयात असलेल्या सर्व रुग्णांनी औषधोपचारास चांगला प्रतिसाद दिल्याने त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्याचे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात सोमवारी (ता.एक) जून सायंकाळी पाचपर्यंत ११६ अहवालांपैकी १०८ स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले. तर सोमवारी सकाळीच तीन नवीन रुग्णांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १४९ इतकी झाली आहे.

हेही वाचा - पोहण्यासाठी गेलेल्या दोन भावांचा बुडून मृत्यू

२१ रुग्णांवर औषधोपचार सुरु
सोमवारी सापडलेल्या नवीन तीन रुग्णांपैकी दोन जण हे २५ व ३५ वर्षांचे पुरुष देगलूर नाका भागातील तर ४० वर्षे वयाचा एक रुग्ण शिवाजीनगर भागातील आहे. आतापर्यंत १२० रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत फक्त २१ रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यातील तीन रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची असल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी दिली आहे.

हेही वाचा - नांदेडकरांना सोमवारने दिला धक्का, पुन्हा तीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर

आतापर्यंत १२० रुग्ण बरे
आतापर्यंत एकूण १४९ रुग्णांपैकी आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून १२० रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर १७६ संशयित व्यक्तींची स्वॅब तपासणी सुरु आहे. रविवारी (ता.३१) मे रोजी १८७ पाठविण्यात आलेल्या स्वॅबपैकी ११६ तपासणी अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित ७१ अहवाल सोमवारी रात्री उशिरापर्यंत प्राप्त होतील. सोमवारी पुन्हा १०५ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल मंगळवारी सायंकाळपर्यंत प्राप्त होतील, असे डॉ. भोसीकर यांनी माहिती देताना सांगितले. कोरोनाला हरवण्यासाठी सतर्क राहुन जनतेने प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सोमवारपर्यंत जिल्ह्यातील माहिती

 • एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- तीन हजार ७२४
 • क्वारंटाईन कालावधी पूर्ण - दोन हजार १४
 • निरीक्षणाखाली-१३८
 • पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - ५३
 • घरीच क्वारंटाईनमध्ये - तीन हजार ६७१
 • नव्याने घेतलेले नमुने - १०५
 • एकुण नमुने तपासणी- तीन हजार ९९५
 • एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- १४९
 • नमुने तपासणी अहवाल बाकी- १७६
 • कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - १२०
 • कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या -आठ
 • जिल्ह्यात  बाहेरून आलेले एकूण प्रवासी एक लाख ४० हजार ३०७

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Great Relief To Nandedkar Sixteen Patients Corona Free Nanded News