पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या गडाला धक्का, मुदखेड पंचायत समितीचे सभापती वंचितच्या गळाला

शिवचरण वावळे
Sunday, 23 August 2020

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. त्यानंतर रविवारी (ता.२३) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन पक्ष प्रवेशाची घोषणा केली.

नांदेड ः मुदखेड पंचायत समितीचे विद्यामान सभापती बालाजी सूर्यतळ यांनी आकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. त्यानंतर रविवारी (ता.२३) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन पक्ष प्रवेशाची घोषणा केली. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री असलले अशोक चव्हाण यांच्या गडाला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
 
शहरातील हॉटेल सिटी प्राईड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहेमद आणि गोविंद दळवी यांनी मुदखेड पंचायत समिती सभापती  बालाजी सूर्यतळ यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कॉँग्रेस पक्षात पद दिले जाते. परंतू, पदाच्या पॉवरचा वापर करु दिला जात नसल्याचा आरोप देखील वंचितच्या वतीने करण्यात आला. ज्यांना इतर कुठल्याही पक्षात अपमानास्पद वागणूक दिली जात असेल अशा प्रत्येकांसाठी वंचित बहुजन आघाडीची दारे खुली असून, पक्षात प्रवेश केलेल्या प्रत्येक व्यक्तीस मान, सन्मानासोबत पद आणि योग्य प्रतिष्ठा दिली जाईल. वंचित बहुजन आघाडी पक्ष हा सामाजिक समतेचे छत्र आहे.

हेही वाचा- पुन्हा काका- पुतण्याचा वाद चव्हाट्यावर, काकाचा मावेजा उचलण्याचा पुतण्याचा डाव धुळीला​

अजून दोन माजी आमदार वंतिच्या संपर्कात

जिल्ह्यातील दोन माजी आमदार देखील वंचित बहुजन पक्षाच्या संपर्कात असून, ते सुद्धा वंचितमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याचे देखील सुचक विधान गोविंद दळवी यांनी केले असले तरी, ते माजी आमदार नेमके कोण आहेत. याबद्दल पक्षाकडून माहिती उघड होऊ शकली नाही. त्यामुळे हे दोन माजी आमदार जर कॉँग्रेस पक्षातील असतील तर मात्र नांदेड जिल्हा कॉँग्रेससाठी व पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी अजून एक मोठा धक्काच असेल.

हेही वाचा- तहसिलदारालाच मागितली खंडणी : एका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह पत्रकारांना पोलिस कोठडी ​

सेनेचे मुदखेड तालुका प्रमुख, विधानसभा प्रमुख वंचितच्या स्टेजवर 

या पत्रकार परिषदेस उपस्थित असलेले शिवसेनेचे मुदखेड विधानसभा प्रमुख तथा ज्येष्ठ नेते विश्वांभर पवार बोलताना म्हणाले की, भोकर आणि मुदखेड या दोन मतदारसंघात शिवसेना पक्ष कॉँग्रेस किंवा भाजपसोबत न जाता वंचित बहुजन आघाडीसोबत राहणार असून, हा शिवसैनिकांचा शब्द असल्याने बाळासाहेबांच्या शिवसेनेत पक्षापेक्षा कार्यकर्त्यांच्या शब्दाला अधिक महत्व दिले जात असल्याचे ते म्हणाले. 
 
या वेळी गोविंद दळवी, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, प्रशांत इंगोले, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय पाटील कुरे, मुदखेड पंचायत समितीचे महिला सदस्य प्रतिनिधी पिंटू पाटील वासरीकर, महासचिव शाम कांबळे, साहेबराव बेळे, महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, अयुब खान पठाण, नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख ॲड. कमलेश चौदंते यांची उपस्थिती होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Ashok Chavan's fort hit, Mudkhed Panchayat Samiti chairman deprived Nanded News