कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन.....कुठे ते वाचा

कृष्णा जोमेगावकर
मंगळवार, 30 जून 2020

या कार्यक्रमात सन २०१८ - १९ व सन २०१९ - २० या वर्षामध्ये कृषिनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी तसेच वसंतराव नाईक कृषी मित्र व शेतीनिष्ठ पुरस्कारासाठी प्रस्तावीत केलेले शेतकऱ्यांना आमंत्रीत करण्यात आले आहे.

नांदेड : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती ता. एक जुलै रोजी कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड येथे बुधवारी (ता. एक) सकाळी सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार करुन त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विकास अधीकारी संतोष नादरे यांनी दिली.

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना निमंत्रीत
या कार्यक्रमात सन २०१८ - १९ व सन २०१९ - २० या वर्षामध्ये कृषिनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी तसेच वसंतराव नाईक कृषी मित्र व शेतीनिष्ठ पुरस्कारासाठी प्रस्तावीत केलेले शेतकऱ्यांना आमंत्रीत करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, कृषी विकास अधिकारी संतोष नादरे, पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. देविकांत देशमुख, प्रा. माणिक कल्याणकर, कापूस संशोधन केंद्राचे डॉ. खीजर बेग, मोहिम अधिकारी गजानन हुंडेकर, कृषी अधिकारी श्री माने आदी उपस्थित राहणार आहेत. 

हेही वाचा.....कृषिक्रांतीचे प्रणेते : वसंतराव नाईक

शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन
या कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार होणार आहे. तसेच गुलाबी बोंडअळी नियंत्रण, कापूस व सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, आपत्कालीन पिक पध्दत या विषयावर डॉ. खीजर बेग, डॉ. देविकांत देशमुख, प्रा. माणिक कल्याणकर यांचे मार्गदर्शन होणार आहे, अशी माहिती संतोष नादरे यांनी दिली.

हेही वाचलेच पाहिजे.....कृषी संजीवनी सप्ताहात गुणवत्ता, शेतकऱ्यांची उत्पन्नवाढीवर जागर

दुबार पेरणीसाठी भरपाई द्या
नांदेड : यावर्षी खरिपाची पेरणी वेळेवर होत असताना काही नामांकित बोगस सोयाबीन कंपन्यांनी आपल्या प्रत्येक जिल्ह्यातील वितरकांमार्फत शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन वेठीस धरले आणि शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने आपल्या शेतात ते बियाणे पेरले, परंतु हे बोगस बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली असल्यामुळे प्रत्येक हेक्टरी 50 हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, अशा मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे यांनी केले.

शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट
अगोदरच करोना या वैश्विक महामारीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खूप खालावली आहे. म्हणूनच जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने बोगस कंपन्यांवर गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई या कंपन्यांकडून वसूल करावी व या कंपन्या कायमस्वरूपी बंद करण्यात याव्यात. तसेच दोषी कंपन्यांवर कठोर कार्यवाही करून गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. 

हेक्टरी ५० हजार रूपये भरपाई द्यावी
शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही छावाचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे यांनी निवेदनाद्वारे दिला. यावेळी संघटनेचे संघटक आप्पासाहेब कुढेकर, औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष अशोक मोरे, शहराध्यक्ष विशाल पाटील आदी उपस्थित होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guidance to farmers on the occasion of Agriculture Day ..... read it where