Guru Nanak Jayanti : श्रीगुरु नानक देव आणि विवेकाधिष्टीत शिख धर्म | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Guru Nanak Jayanti

Guru Nanak Jayanti : श्रीगुरु नानक देव आणि विवेकाधिष्टीत शिख धर्म

भारतातील विविध सामाजिक आणि धार्मिक परंपरांपैकी एक धार्मिक आणि वैचारिक विचारधारा म्हणजे शिख धर्म होय. इसवीसनाच्या पंधराव्या शतकात भारतातील पंजाब प्रांतात श्रीगुरु नानक देव यांच्या प्रेरणा आणि वैचारिक परीपेक्षामध्ये शिख धर्माचा उदय झाला. आधुनिक जगाच्या धर्म इतिहासाच्या प्रमुख धर्मामध्ये शिख धर्म हा अत्यंत तरूण आणि झपाट्याने विकसित होणारा धर्म म्हणून ओळखला जातो आहे.

शिख धर्म आणि त्याचे अनुयायी संपूर्ण जगभर पसरलेले असून अंदाजे अडीच ते तीन कोटी लोकसंख्या असलेला जगातील पाचव्या क्रमांकाचा हा धर्म आपली तत्वे व्यवस्थितपणे पालन करतांना इतर कोणत्याही धर्माच्या कार्यप्रणालीमध्ये हस्तक्षेप करतांना दिसत नाही. शिख धर्माची बैठक ही प्रामुख्याने शिख धर्माचे प्रथम गुरु श्रीगुरु नानक देव यांच्या अध्यात्मिक शिकवण आणि तत्वांवर उभी राहिलेली दिसून येते. श्रीगुरु नानक देव यांच्या नंतर सतराव्या शतकांपर्यंत शिख धर्माच्या नऊ श्रीगुरुंनी शिख धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आढळून येतो. शिख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंघ यांनी शिख धर्माचा पवित्र धर्मग्रंथ श्रीगुरु ग्रंथ साहिब या ग्रंथाची निर्मिती करून हा ग्रंथच शिख धर्माचा अकरावा आणि शेवटचा गुरु मानला जावा असे सांगून यापुढे गुरु परंपरेला पूर्णविराम दिलेला दिसून येतो. 

पंधराव्या शतकात जन्मलेले श्री गुरु नानक देव हे अत्यंत चिंतनशील प्रवृतीचे होते. वयाच्या अकराव्या वर्षी फारसी भाषा पारंगत करून हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्माच्या संत मंडळी सोबत त्यांचा विचारविनिमय होत असे. अगदी लहान वयातच विवेकवादी विचार करणे आणि अंधश्रद्धावादि मिथ्या विचारापासून गुरु नानक फटकून वागत. नानक हे लोकांमध्ये न मिसळता एकांतवासात वेळ घालवत. वडिलांना आपल्या मुलाच्या एकांतवासाची चिंता लागल्याने त्यांनी ज्योतिष्याला बोलावले, परंतु गुरु नानक हे विवेकवादी विचार करीत असल्याने त्यांनी ज्योतिषाला परत पाठवले.

गुरु नानक यांचे वडील त्यांना व्यवसायात उतरण्याचे मार्गदर्शन करीत होते, पण ते एकांतवासात रहायला पसंत करत असल्याने त्यांचे व्यवसायात मन लागले नाही. शेवटी वडिलांनी गुरु नानक यांना विवाह बंधनात बांधले. त्यांना दोन मुले झाली परंतु गुरु नानक यांचे मन संसारात रमले नाही. सकाळी लवकर उठणे नदीवर स्नान करणे आणि तासंतास तिथेच चिंतन करत बसने असा त्यांचा दिनक्रम चाले. एकदिवस ते नदीवर अंघोळीला गेले आणि तीन दिवस कुणाला दिसलेच नाहीत. सर्व लोकांना वाटले कि ते नदीत बुडाले किंवा वाहून गेले. तीन दिवसानंतर जेंव्हा ते बाहेर आले तेंव्हा ते लोकांना भेटल्यावर म्हणाले, 'मी हिंदूही नाही आणि मुसलमानही नाही, मी केवळ एक मनुष्य आहे.

' त्या तीन दिवसांत नानकांना काहीतरी आत्मसाक्षात्कार झाला असावा. त्यानंतर मात्र गुरु नानक यांनी अनेक हिंदू तीर्थांचे तीर्थाटन केले. विविध ठिकाणी जाऊन लोकांना धर्म उपदेश दिला. त्यांनी सुप्रसिद्ध बौद्ध आणि जैन तीर्थांना भेटी दिल्या. या विविध यात्रेदरम्यान गुरु नानक यांची अनेक सिद्ध आणि ज्ञानी पुरुषांशी चर्चा झाली. त्यांच्या या सर्व यात्रांना त्यांनी 'उदासिया' असे नाव दिले होते. गुरु नानक देव हे जीवन समजून घेण्यासाठी आणि जनकल्याणार्थ विविध देशाचे भ्रमण केले. वाटेत भेटलेल्या लोकांना उपदेश केला. 

श्रीगुरु नानक देव यांच्या काळात धार्मिक अवडंबर बोकाळले होते. जुनाट रूढीवादी जीवन, अंधश्रद्धा, भ्रष्ट आचार यांनी धर्मक्षेत्र पोखरून निघाले होते. तत्कालीन सर्वच धर्माचे नैतिक अध:पतन झाले होते. सर्वत्र थोतांड आणि कट्टर सांप्रदायिकतेने हाहाकार माजवला होता. धर्मातील सत्यविचार झाकोळले होते. सर्वत्र पाखंडी विचारांनी धर्म डागाळला होता. प्रत्येक धर्मप्रचारक आपलाच धर्म कसा श्रेष्ठ आहे हे पटवून देण्यात गुंग होता, परंतु मानवता, सत्य, अहिंसा, प्रेम हि महान मानवी मुल्ये सर्वच विसरून गेले होते. त्याकाळात धर्म हा केवळ काय खावे? काय प्यावे? अंघोळ कशी करावी? गंध कसा लावावा? या भौतिक गोष्टीभोवती अडखळला होता.

कट्टरता, मूर्तीपूजा, गंगास्नान, यात्रा आणि अनुष्ठान यांनी सर्वत्र गोंधळ मांडला होता. साधू, संन्यासी, योगी, हटयोगी हे आपणच कसे श्रेष्ठ आहोत हे सांगण्यात गुंतले होते. मंत्र-तंत्र, रिद्धी-सिद्धी, पूजा-अर्चा, शास्त्राचे व्यर्थ खंडन-मंडन यात समाज आणि तत्कालीन धर्म गुरफटला होता. दुसरीकडे श्रीमंत वर्ग हा नाच-गाणे, व्यभिचार यात मश्गुल होता तर गोर-गरीब लोक उच्च-नीच या जाती बंधनात अडकलेले होते. त्याच काळात शिकंदर लोधीने आणि बाबराने हिंदू मंदिरांची विटंबना आणि तोडफोड सुरु केली होती. अनेक गोर-गरीब लोकांचे बळजबरी धर्मांतर सुरु होते.

थोडक्यात सांगायचे म्हणजे मुसलमान शासक सामान्य लोकांवर अन्याय-अत्याचार करत आणि हिंदू शासक आणि धर्म प्रसारक लोकांना कर्मकांड, अवडंबर आणि मिथ्याचार यामध्ये अडकवून ठेवत. त्यांची पिळवणूक करत. हिंदू-मुसलमान या दोन धर्माच्या प्रसारक आणि अनुयायी लोकांमध्ये प्रचंड असूया निर्माण झाली होती. गुरु नानक यांना हे सर्व थोतांड आणि भेदाभेद पटले नाहीत. भोवतालचे हे दृश्य पाहून त्यांचे हृदय पिळवटून जात असे. ते उद्विग्न होत आणि दूर नदीकिनारी एकांतात ध्यानस्थ बसत. शेवटी त्यांनी सत्य आणि विवेक याची कास धरून जीवन आणि धर्माचरण करायचे ठरवले.

 हिंदूंची बहुदेवोपासना, मूर्तीपूजा, कर्मकांड आणि इस्लाममधील हिंसा हि तत्वे श्रीगुरु नानक देव यांना मान्य झाली नाहीत. त्यांनी माणसांतच ईश्वर पाहिला. अवतार परंपरा, सगुण-निर्गुण भक्ती, जातीभेद, लिंगभेद, जप-तप, योग, अनुष्ठान, पूजा-अर्चा इत्यादी अवडंबर नानकांना मुळीच पटत नसे. याचा परिणाम म्हणजे त्यांनी नवीन धर्म स्थापन करायचे ठरवले. गुरु नानक हे जगभर फिरल्याने, विविध धर्माचे ग्रंथ वाचन केल्याने ते विद्वान, योगाभ्यास पारंगत आणि सर्व धर्मतत्वांचा चिकित्सक आणि तुलनात्मक अभ्यास केलेले विवेकशील पुरुष झाले होते. गुरु नानकांचा सद्सदविवेक पूर्णतः जागृत झाला होता.

त्यामुळे त्यांनी 'एक ही ओंकार' हा मूलमंत्र घेऊन 'एकेश्वरवाद' या तत्वावर आधारित शिख धर्म हा नवीन धर्म स्थापन केला. वर्णभेद, जातभेद, लिंगभेद, उच्च-नीच भेद, श्रेष्ठ-कनिष्ठ, गरीब-श्रीमंत इत्यादी भेद रहित जीवन आणि आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत हा वैश्विक विचार घेऊन त्यांनी शिख धर्म स्थापन केला. गुरु नानक देवांनी शिख म्हणजे शिकवण आणि सुमिरन म्हणजे ईश्वराचे आणि श्री गुरूंच्या उपदेशाचे आत्मिक स्मरन करणे होय असे सामान्य लोकांना पटवून सांगितले. सातत्याने ओंकाराचे नामस्मरण किंवा नामजप करणे हेच शिख धर्माचे मुलतत्व गुरु नानकांनी समाजात रुजविले.

गुरु नानक देवांनी शिख धर्म म्हणजे कोणतेही कर्मकांड, पूजा-अर्चा, थोतांड, अवडंबर नसून एक आदर्श जीवन पद्धती आहे असे सांगितले. हा धर्म म्हणजे कोणतीही उच-निचता नाही, निरंतर नामस्मरण, ईश्वर कीर्तन, एकच ओंकार जप, एकेश्वर वाद, निर्मळ धार्मिक वर्तन, निर्मळ मन, शुद्ध चरित्र आणि चारित्र्य इत्यादी धार्मिक आणि सामाजिक आदर्श शिख धर्माची महत्वपूर्ण सूत्रे आहेत याचे प्रतिपादन केले. तत्कालीन समाजात हि नवतत्व रुजवितांना गुरु नानक देव यांना विविध स्तरावर विरोधही सहन करावा लागला.

प्रचलित धर्माच्या धर्ममार्तंडांनी त्यांना कडाडून विरोधही केला. त्यांच्यावर खूप टीकासुद्धा झाली, परंतु श्रीगुरु नानक हे आपल्या विचारापासून ढळले नाहीत आणि होणाऱ्या विरोधाचे निर्भयतेने खंडन करून शिख धर्माचे तत्व सामान्य लोकांपर्यंत पोहचवले. श्री गुरूंनी काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार हे पाच सर्वांत मोठे शत्रू असून यावर नियंत्रण ठेवूनच माणसाला आनंदप्राप्ती, ईश्वरप्राप्ती होऊ शकते असा महत्वपूर्ण उपदेश केला. हि साधीसोपी तत्वे सामान्य लोकांना पटायला लागली. इतर धर्मामध्ये छळ आणि भेदाभेद होत असतांना सामान्य लोकांना समानतेची शिकवणूक देणारा धर्म म्हणून लवकरच शिख धर्म सामान्य लोकांमध्ये प्रसिद्ध झाला. लोकांना वाळवंटात मरुद्यान दिसावे तसे झाले आणि हजारो लोकांनी धर्मांतर करून शिख धर्म स्वीकारला. 

 अलीकडच्या तीन-चारशे वर्षात शिख धर्माची झपाट्याने वाढ झालेली दिसून येते. यामुळेच भारतात पुढे काही मुघल शासकांनी श्रीगुरू अर्जुन देव आणि श्रीगुरू तेगबहाद्दूर यांचा छळ करून त्यांना मृत्युदंड दिला. हा या धर्मावरील मोठा आघात होता. असा वाढता धार्मिक छळ आणि गुरूंची होणारी कत्तल पाहून सतराव्या शतकाच्या शेवटी शिख धर्माचे दहावे आणि शेवटचे गुरु श्रीगुरु गोविंद सिंघ यांनी शिख धर्मामध्ये विवेक आणि धर्म स्वातंत्र्याचे रक्षण व्हावे या उद्देशाने 'खालसा'ची स्थापना केली. तेंव्हापासून शिख धर्मप्रसारक हे 'संत शिपाई' म्हणून ओळखले जाऊ लागले. परिणामी शिख धर्मप्रसारक किंवा सामान्य शिख स्त्री-पुरुष हे सुद्धा स्वसंरक्षणार्थ शस्त्रधारण करतांना दिसतात. 

 अशाप्रकारे अनेक चढ-उतार, आणि धार्मिक स्थित्यंतरांना सामोरे जात, विविध प्रकारच्या धार्मिक वादळात शिख धर्म हा आधुनिक जगामध्ये धीरोदत्तपणे उभा असून आपली धर्मतत्वे टिकवून आहे. हा धर्म तरुण-तरुणींना आकर्षित करत असून शिख धर्माचे अनुयायी दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहेत. धार्मिक सहिष्णुता, वैचारिक प्रगल्भता, एकेश्वरवाद, समानता, एक ओंकार जप आणि ईश्वर सुमिरन इत्यादी सर्वसमावेशक तत्त्वांनी हा धर्म आजतागायत टिकवून ठेवला आहे. बदलत्या काळात 'लंगर' आणि 'कर सेवा' हि शिख धर्माची विशेष नोंद घेण्यासारखी तत्वे जगाने स्विकारली पाहिजेत. 'भुकेल्यांना अन्न' हे महान तत्व लंगर सारखी कृतीशिल बाब जर सर्वच धर्म आणि धार्मिक स्थळांनी अंगिकारली तर जगात कुणीच ईश्वराचा पुत्र-पुत्री उपाशीपोटी झोपणार नाही. अन्नदानाचे हे महान लोकतत्व जर जगातील सर्वच धर्मांनी अंगिकारले तर शिख धर्माचे संस्थापक श्रीगुरू नानक देव यांनी स्थापन केलेल्या नव्या विचाराच्या शिख धर्माचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही आणि हीच श्रीगुरु नानक देव यांना त्यांच्या जयंतीदिनी आदरांजली असेल.  

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये