स्कॉर्पिओ वाहनासह सव्वा लाखाचा गुटखा जप्त

सद्दाम दावणगीरकर
Sunday, 8 November 2020


सीमावर्ती कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधित तंबाखू बेकायदा विक्री करण्याच्या उद्देशाने स्कॉर्पिओ या चारचाकी वाहनातून वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून मरखेल पोलिसांनी केलेल्या सापळा कार्यवाहीत एक लाख ३२ हजारांचा सुगंधित तंबाखू व गुटखा ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. ही कार्यवाही शनिवारी (ता.सात) रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास मरखेल येथील शासकीय गोडाऊनजवळ करण्यात आली आहे. 
 

मरखेल, (ता. देगलूर, जि. नांदेड) : सीमावर्ती कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधित तंबाखू बेकायदा विक्री करण्याच्या उद्देशाने स्कॉर्पिओ या चारचाकी वाहनातून वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून मरखेल पोलिसांनी केलेल्या सापळा कार्यवाहीत एक लाख ३२ हजारांचा सुगंधित तंबाखू व गुटखा ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. ही कार्यवाही शनिवारी (ता.सात) रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास मरखेल येथील शासकीय गोडाऊनजवळ करण्यात आली आहे. 

वाहनाची घेतली झडती 
प्राप्त माहितीनुसार यातील सय्यद शकील सय्यद शादुल (रा. सावळी ता. बिलोली) व अशोक लाकडे (रा. बिलोली) हे दोघेजण स्कॉर्पिओ वाहन क्र. एम. एच. ४६ डब्लू. ४०९२ या वाहनातून राज्यात प्रतिबंधित असलेला अंबर नावाचा सुगंधित तंबाखू व आरएमडी नावाचा पानमसाला किंमती एक लाख ३२ हजारांचा गुटखा शेजारील कर्नाटक राज्यातून बिलोली येथे वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती मरखेल पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरून (ता.सात) रोजी सायंकाळी ६ : ४५ वाजता येथील गोडाऊनजवळ मरखेल पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर, उपनिरीक्षक अजित बिरादार, पोलिस जमादार सुभाष सिद्धेश्वरे, मुजीब पठाण, पोलिस शिपाई ग्यानोबा केंद्रे, कोल्हे, गृहरक्षक दलाचे अंबुरे, शिवराये आदींनी सापळा रचून सदरील वाहनाची झडती घेतली असता, या वाहनात उपरोक्त प्रतिबंधित माल मिळून आला. पोलिसांनी गुटखा व स्कॉर्पिओ वाहन असा पाच लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

 

हेही वाचा -  विधिमंडळ समित्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातील या आमदारांना वगळले

 

गुटखा वाहतूक करण्याचे प्रमाण सर्वाधिक 
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी या भागात गुटखा विक्री व वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू होती. मात्र स्थानिक पोलिसांनी मोठ्या कार्यवाह्या करून थोडेफार या धंद्यावर वचक बसविला होता. राज्यात गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू प्रतिबंधित करण्यात आलेला असल्याने सीमावर्ती कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात गुटखा आणला जातोय. आजपर्यंत या लोकांवर केवळ स्थानिक व वरिष्ठ पथकातील पोलिसांनीच कारवाया केल्या आहेत. अन्न व औषधी प्रशासनाचे अन्नसुरक्षा अधिकारी मात्र या भागात एकही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. परिणामी या विभागावर साशंकता व्यक्त केली जात आहे. सीमावर्ती मरखेल, मुक्रमाबाद व देगलूर या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सर्रास गुटखा वाहतूक करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई ग्यानोबा केंद्रे यांच्या फिर्यादीवरून उपरोक्त दोघांवर गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सुर्यतळ हे करीत आहेत. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gutka Worth Rs 1 lakh Seized Along With Scorpio Vehicle, Nanded News