हॅलो! नमस्कार…मी महावितरणमधून बोलतोय- थकबाकीदार ग्राहकांना बील भरण्याची साद

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 16 September 2020

नांदेड परिमंडळात 5 लाख 79 हजार 451 ग्राहकांकडे 452 कोटी 20 लाख रूपयांची थकबाकी

नांदेड : हॅलो! नमस्कार… मी महावितरणमधून बोलतोय आपण आपले वीजबिल भरले आहे का ? नसेल भरले तर कृपया लवकर भरा…’ असे विनम्र आवाहन करणारे फोन सध्या वीजग्राहकांना येत आहेत. मात्र आपण या फोनची वाट न पाहता एक जबाबदार नागरिक व वीजग्राहक म्हणून आपले बिल नजिकच्या वीजबिल भरणा केंद्रात किंवा ऑनलाईन भरुन सहकार्य करावे असे विनम्र आवाहन महावितरणचे कर्मचारी सध्या करीत आहेत.

गेल्या पाच-साडेपाच महिन्यांपासून कोवीड-19 च्या संक्रमण काळात वसूली ठप्प झाल्याने महावितरणसह इतर वीज कंपन्या आर्थिक संकटात आल्या आहेत. इतकंच नाही तर हा उद्योग वाचविण्यासाठी महावितरणलाही कर्ज घ्यावे लागत आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे बंद ठेवावी लागल्याने ग्राहकांना ऑनलाईन वीजबिल भरण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र वीजग्राहकांनी त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही. नांदेड परिमंडळात ऑगस्ट 2020 अखेर 5 लाख 79 हजार 451 घरगुती, वाणिज्यिक व लघुदाब औद्योगिक वीजग्राहकांकडे तब्ब्ल 452 कोटी 20 लाख रूपये थकले आहेत. यामध्ये हिंगोली जिल्हयातील 1 लाख 15 हजार 985 वीजग्राहकांकडे 44 कोटी 54 लाख रूपये, परभणी जिल्हयामधील 1 लाख 57 हजार 433 वीजग्राहकांकडे 298 कोटी 34 लाख रूपये तर नांदेड जिल्हयातील 3 लाख 6 हजार 33 वीजग्राहकांकडे 109 कोटी 33 लाख रूपये थकीत आहेत.

वीजग्राहकांचे समाधान झाल्यामुळे वीजबील भरण्यास वाढता प्रतिसाद

वीजदेयक भरण्यास काही प्रमाणात प्रतिसाद मिळत असला तरी वीजबील भरण्याचे प्रमाण समाधान कारक नाही. त्यामुळेच नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांच्या निर्देशानुसार एसएमएस, व्हॉटसअप ग्रूप या माध्यमांसोबतच आता वीजग्राहकांना प्रत्यक्ष भेट देत वीजबीलाबाबत समाधान करून आणि मोबाईल व्दारे संवाद साधत वीजबील भरण्याविषयी जनजागृती केली जात आहे. एप्रिल ते ऑगस्ट अखेर पर्यंत 2 लाख 12 हजार वीजग्राहकांना महावितरणने मोबाईल व्दारे सुसंवाद साधला आहे. याकरिता दैनंदिन कामासोबतच विभागनिहाय खास कर्मचाऱ्यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वीजग्राहकांचे समाधान झाल्यामुळे वीजबील भरण्यास वाढता प्रतिसाद मिळत आहे. मागील 14 दिवसात 1 लाख 35 हजार 666 वीजग्राहकांनी 25 कोटी 86 लाख रूपयांचा भरणा केला आहे. यामध्ये 54 हजार 94 वीजग्राहकांनी 9 कोटी 98 लाख रूपये ऑनलाईनच्या माध्यमातून भरले आहेत.

बील जादा वाटणाऱ्या ग्राहकांनी आपल्या मीटरवरील वापर तपासावा व वीजबिल भरावे.

एकीकडे लॉकडाऊनच्या काळात जनता घरात अडकून होती. या काळात घरगुती ग्राहकांचा वीजवापर वाढला. त्या सर्वांना अखंडित वीजपुरवठा केल्याने लॉकडाऊन यशस्वी करण्यात महावितरणने मोलाचे योगदान दिले. जून महिन्यापासून वीजमिटरचे रिडींग घेण्यास सुरुवात झाली असून, येणारी बिले ही चालू रिडींगनुसार देण्यात येत आहेत. त्यामुळे प्रथमदर्शनी आलेले बील जादा वाटणाऱ्या ग्राहकांनी आपल्या मीटरवरील वापर तपासावा व वीजबिल भरावे. वीजबिलाबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिक माहितीसाठी महावितरणच्या मोबाईल ॲपचा वापर करावा किंवा www.mahadiscom.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hallo… I am speaking from MSEDCL - call for outstanding customers to pay their bills nanded news