Nanded : अतिवृष्टीतून वाचलेल्या सोयाबीन काढणीस प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded

Nanded : अतिवृष्टीतून वाचलेल्या सोयाबीन काढणीस प्रारंभ

हिमायतनगर : तालुक्यात अतिवृष्टीने खरिपाच्या पेरणीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या तडाख्यातून काही प्रमाणात वाचलेल्या सोयाबीन काढणीस आता शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. हाती आलेल्या उत्पादनात मोठी घट झाली असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

तालुक्यात यावर्षीच्या चालू हंगामात नगदी पीक सोयाबीनचा पेरा सर्वात जास्त प्रमाणात केला आहे. या वर्षी खरिपाच्या पेरणीच्या सुरूवातीला मोसमी पावसांने चांगली सुरूवात केली असल्याने पिके बहरली परंतू नंतरच्या काळात पावसाने आक्रमक पवित्रा घेतला, धो-धो बरसणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या गोड स्वप्नांचा चुराडा केला. नदी-नाल्यांनी आक्राळ विक्राळ रूप धारण केले. परिणामी नदी, नाल्याच्या काठावरील पिके खरडून वाहून गेली, तर अती पावसाने पिकांच्या मुळ्याच नासून गेल्या असल्याने पिकांची अपेक्षित वाढ झाली नाही. सोयाबीनची तर अतिशय नाजूक अवस्था बनली आहे.

ऐन उमेदीच्या काळात सोयाबीन वर अतिवृष्टीच्या पावसाचा घाला बसला. परिणामी सोयाबीनची अपेक्षित वाढ झाली नाही. त्यामुळे लाग कमी लागला असल्याने आपसूकच उत्पादनात विक्रमी घट निर्माण झाली आहे. उत्पादनाच्या प्रमुख स्तोत्रात सोयाबीन बरोबर कपाशी येते, परंतू कपाशीची अवस्था ही नाजूकच आहे.

अबक पेरणीतील सोयाबीन काढणीला आले असून या भागात सोयाबीन काढणीला शेतकऱ्यांनी जोरदार प्रारंभ केला आहे. सोयाबीन काढणीनंतर रब्बी हंगाम घेण्यासाठी शेतकऱ्यांना तयारी करावी लागणार असून त्यासाठी शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही, सोयाबीनात घट आणि शेतकऱ्यांच्या हातात सोयाबीन पडताच नेहमीप्रमाणेच भाव पाडण्याचा डाव आखल्या जात आहे. गरजुवंत शेतकऱ्यांना सोयाबीन विकल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पडलेल्या भावात शेतकऱ्यांना सोयाबीनची विक्री करावी लागणार आहे.