सोशल मीडियातून मांडली व्यथा अन् लग्नाची मिटली चिंता

बंडू माटाळकर
Thursday, 28 May 2020

संकटावर संकट झेलत आईने तिन्ही मुलींना तळहातावरील फोडाप्रमाणे लहाणाचे मोठे केले. मुली वयात येऊ लागल्याने आईची चिंता वाढतच गेली, घरची परिस्थिती अठराविश्व दारिद्र अत्यंत हलाखीची. रोजमंजुरी केल्याशिवाय चूल पेटत नाही. परंतु, ज्याच्या मागे कोणी नाही त्याच्या पाठीशी देव असतो. 

निवघा बाजार, (ता.हदगाव, जि. नांदेड) ः येथील गरीब कुटुंबातील वडिलांचे छत्र हरवलेल्या सपना भांडवलेच्या लग्नासाठी सोशल मीडियातून केलेल्या आवाहानाला प्रतिसाद देत अनेक दात्यांनी लग्नासाठी मदत केल्यामुळे येत्या दोन जून रोजी सपनाच्या लग्नाला बहार येणार आहे.

हेही पाहा - Video:  रस्त्यांचा होता अडथळा, मग प्रसूतीसाठी बैलगाडीच आली साथीला...

 

वडील सखाराम भांडवले यांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले. तीन मुली व एक मुलगा असलेल्या आई अनितावर घराची सर्व जवाबदारी पडली. एकच असलेला मुलगा दुखण्यातून सावरण्याआधीच पैशाअभावी जग सोडून गेला. संकटावर संकट झेलत आईने तिन्ही मुलींना तळहातावरील फोडाप्रमाणे लहाणाचे मोठे केले. मुली वयात येऊ लागल्याने आईची चिंता वाढतच गेली, घरची परिस्थिती अठराविश्व दारिद्र अत्यंत हलाखीची. रोजमंजुरी केल्याशिवाय चूल पेटत नाही. परंतु, ज्याच्या मागे कोणी नाही त्याच्या पाठीशी देव असतो. या मराठी म्हणीप्रमाणे मोठ्या मुलीचे लग्न गतवर्षी साई प्रसाद ट्रस्ट नांदेडच्या वतीने संसारोपयोगी साहित्य देऊन, व्यापारी, पत्रकार यांच्या मदतीने धुमधडाक्यात झाले. 

आई अनिताचे डोळे पानावले
आता दुसरी मुलगी सपना उपवर झाल्याने आई अनिता हिने मदतीसाठी पत्रकारांना फोनवरून मदतीची इच्छा बोलून दाखवली. परंतु, लॉकडाउन असल्याने व्यापारी वर्ग सर्वच हैराण आहेत. परंतु, येथील पत्रकार संघटनेच्या वतीने सुरवातीला अडीच हजारांची मदत करून सोशल मीडियावर सपनाच्या लग्नासाठी मदतीचे आवाहन केले. या आवाहानाला प्रतिसाद देत नांदेड येथील वकील गजानन उज्जेवाड यांनी अकराशे रुपये, पंचायत समितीचे माजी सभापती बालासाहेब कदम एक हजार रुपये, प्रदीप चिल्लोरे, मारोती कदम, राजलक्ष्मी दूध डेअरी यांनी प्रत्येकी ५०० रुपयांची मदत करून सपनाच्या लग्नाला मदत दिल्याने सपनाची आई अनिताचे डोळे पानावले होते.

मदत करण्याचे आवाहन
गतवर्षी सपना हिची बहीण मेघा भांडवलेच्या लग्नासाठी नांदेड येथील साई प्रसाद या संस्थेने संसारोपयोगी साहित्य दिले होते. त्यामुळे आई अनिता हिला खूप आधार मिळाला होता. या वर्षी आपल्या लहान मुलीला साई प्रसाद या संस्थेने मदत करावी, असे वाटते. तसे साईप्रसाद संस्थेला मदतीचे आवाहन करण्यासाठी येथील पत्रकारांनी कळविले असून सपना हिला मदत मिळण्याची शक्यता असून आणखी कोणाला मद्दत करण्याची इच्छा असल्यास आपण मदत करू शकता, असे आवाहन सपनाची आई अनिता भांडवले यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Help For Orphan Girl's Marriage, Nanded News