
शहापूर, शेखापुर परिसरातील शेतकऱ्यांनी केली हायटेक शेती
देगलूर : गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून तेच ते पिके शेतीत घेण्याने पारंपरिक पिकांना मर रोगाची लागण लागू लागली होती. सततच्या पाणी वापरामुळे जमिनीतील बुरशीचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढू लागल्याने पारंपरिक पिकांना फाटा देण्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्यायच उरला नव्हता. त्यामुळे शहापूर, शेखापुर परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मसालेजन्य पदार्थांमध्ये उपयोगी ठरणाऱ्या कोथिंबीर पिकाचे उत्पन्न घेण्याचे ठरविले. यावर्षी तालुक्यात प्रथमच पाचशे एकरवर कोथिंबीर पीक सध्या बहरु लागले. या परिसरातील शेती सध्या कोथिंबिरीच्या पांढऱ्या फुला बरोबरच सुगंधी
श्वासाने हा परिसर उजळून गेला आहे.
रब्बी हंगामातील हरभरा, करडई हे कडधान्याचे पीक शहापूर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घेतले जायचे. वारंवार तेच ते पीक घेतले गेल्याने दोन-तीन वर्षापासून हरभरा व करडी पिकांना मोठ्या प्रमाणात मर रोगाची लागण लागत असल्याने त्याचा उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत होता. त्याच त्या पिकामुळे जमिनीतील आर्द्रतेचे प्रमाणही वाढायला लागल्याने बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात फोफावु लागला होता. पारंपारिक घेतल्या जाणाऱ्या हरभरा पिकाच्या उत्पादनाला फाटा देत शहापूर येथील यालावार बंधूनी स्वतःच्या २२ एकरवर कोथिंबीर (धने) या पिकाची लागवड करण्याचा धाडसी पण प्रयोगशील प्रयोग करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी एकरी १४ किलो बियाणे वापरले, तीन वेळेस पाणी देऊन दोन कीटकनाशकाची फवारणी केली. सध्याला पीक पूर्णता भरात आले असून २२ एकर वर आलेल्या पांढऱ्या फुलाने हा संपूर्ण परिसर सुगंधित श्वासाने दरवळून गेला आहे.
हेही वाचा - नांदेड : डिसेंबरमध्ये गॅस दरवाढीच्या किमतीत शंभर रुपयांचा भडका -
एकरी नऊ ते दहा क्विंटल उत्पन्न अपेक्षित
ऑक्टोंबरमध्ये लागवड केलेले कोथिंबीर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात काढणीला येईल एकरी नऊ ते दहा क्विंटल उत्पादन या पिकातून होते. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे प्रति क्विंटल सात ते आठ हजार रुपयांचा भाव या पिकांना येऊ शकतो. तसेच यावर प्रक्रिया करून कोथिंबीर पासून मसाल्याची भुकटी पावडर बनविले, तर शेतकऱ्यांना चांगला नफा हाती येईल, यासाठी थोडीशी गुंतवणूक मात्र करावी लागेल. यासाठी शासन स्तरावर छोटासा प्रकल्प घेण्यासाठी अनुदानाचीही सोय उपलब्ध असल्याचे कृषी खात्यातर्फे सांगण्यात आले. तालुक्यातील विष्णू पाटील खांडेकर, पांडू पाटील, विठ्ठल पाटील, हनुमंतराव खांडेकर, नामदेवराव खांडेकर, बळवंतराव खांडेकर, अशोक खांडेकर, अशोक गवळे आदी शेतकऱ्यांनीही शेखापुर परिसरात पारंपरिक पिकांना फाटा देत आपल्या शेतीत कोथिंबीर पिकाचे उत्पादन घेतले आहे.
पारंपरिक पिकांना फाटा देत नवीन मसाले जन्य पदार्थ उत्पादनाच्या शेतीकडे वळण्याचा प्रयत्न आम्ही शेतकरी मिळून जाणीवपूर्वक घेतला आहे. तालुक्यातील या वर्षीचे चांगले उत्पन्न लक्षात घेता कोथिंबीरीच्या कच्च्या मालापासून भुकटी पावडर बनवण्यासाठी एक छोटासा प्रकल्प या परिसरात उभारण्याचा प्रयत्न आम्ही शेतकरी मिळून करणार आहोत.
- विलास रेड्डी यालावार, मल रेडी यालावार, कोथिंबीर उत्पादक शेतकरी.
प्रयोगशील पद्धतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वरचेवर वाढत चालला असून तालुक्यात सहाशे एकर वर पेरू, सीताफळ ही फळपिके घेतली गेली असून यावर्षी प्रथमच कोथिंबीर या सारख्या मसाला जन्य पिकाचेही ५०० एकरवर उत्पादन घेतले गेले आहे. त्याचा निश्चितच चांगला फायदा शेतकऱ्यांना होईल.
- शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी देगलूर.
संपादन - प्रल्हाद कांबळे