सगरोळीत शेकडो एकर जमीन गेली पाण्याखाली

अभिजित महाजन 
Tuesday, 15 September 2020

अतिवृष्टीमुळे सखल भागातील शेतीला नदीचे स्वरूप आले आहे. सगरोळी व आदमपूर (ता.बिलोली) येथील नाल्यालगतची शेकडो एकर जमीन पाण्याखाली आल्याने संपूर्ण पिक खरडून वाहून गेले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

सगरोळी (नांदेड) : साधारण पंधरा ते वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर सगरोळी (ता.बिलोली) परिसरात सोमवारी (ता.१४) मध्यरात्री हजेरी लावलेल्या पावसाने मंगळवारी (ता.१५) पहाटे आपला रुद्रावतार दाखविला आहे. या अतिवृष्टीमुळे सखल भागातील शेतीला नदीचे स्वरूप आले आहे. सगरोळी व आदमपूर (ता.बिलोली) येथील नाल्यालगतची शेकडो एकर जमीन पाण्याखाली आल्याने संपूर्ण पिक खरडून वाहून गेले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. या अतिवृष्टीमुळे उडीद, तूर व हाताशी आलेले सोयाबीन या पिकाचे प्रचंड नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. 

यावर्षी खरीप हंगाम वेळेवर सुरू झाला, परंतु शेतकऱ्यांच्या मागील संकट काही सुटता सुटेना अशीच प्रचीती येत आहे. वेळेवर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी उत्साहात पेरण्या पूर्ण केल्या. परंतु सोयाबीनच्या बियाणांनी दगा दिलाया आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. ठराविक कालांतराने व पिकयोग्य पाऊस झाल्याने सर्व पिके बहरली आहेत.

ऐन मुग काढणीच्या वेळेसच पावसाने सतत आठ दिवस हजेरी लावल्याने जागेवरच मोड लागून नुकसान झाले होते. मागील आठ दिवसांपासून परिसरात उडीद पिकांच्या काढणीची लगभग सुरु होती. पंधरा ते वीस दिवसाच्या उघडीपमुळे सोयाबीन शेंगांनी बहरले होते. परंतु झालेल्या पावसामुळे हाताशी आलेले उडीद पिक पूर्णतः नेस्तनाबूत झाले तर सोयाबीनचेही प्रचंड नुकसान झाले आहे. 

परिसरातील नाल्यांना नदीचे स्वरूप... 
 

बोळेगाव आणि सगरोळी दरम्यानचा ९ किमी अंतराचा नाला, मूतन्याळ, मिनकी, केसराळी या शिवारातील ६ किमीचा नाला व केरूर, आदमपूर, थडीसावळी, खतगाव या गावाच्या शिवारातून जाणारा ७ किमी लांबीचा नाला फुटल्यामुळे नाल्यातील पाण्याने शेकडो एकर जमीन आपल्या कव्हेत घेतले आहे. मंगळवारची पहाट ही येथील शेतकऱ्यांसाठी भयावह ठरली आहे. अतिवृष्टी आणि नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह प्रचंड मोठा असल्याने दुथडी भरून वाहणारा नाला अनेक ठिकाणी फुटून शेतात पाणी घुसले आहे. तसेच शेतजमीन खसून पिके वाहून गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. पाच तासाच्या अतिवृष्टीमुळे पाहता पाहता नाल्याचे नदीत रुपांतर झाले आहे. 

शासनाने पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत... 
 

सगरोळी व आदमपूरसह परिसरात अतिवृष्टीमुळे उडीद व सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने प्रशासनाने त्वरित पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी भाजप बिलोली तालुका सरचिटणीस मारुती राहिरे यांनी केली. प्रशासनाने जलद कार्यवाही करावी, अशी शेतकऱ्यांनीही मागणी केली आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundreds of acres of land in Sagaroli taluka have been inundated due to rains