पोलिस कोठडी : खतगाव शिवारातील खुनाचे रहस्य उलगडले! प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून...!! 

अनिल कदम
Saturday, 16 January 2021

मयताच्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने त्याचा खून केल्याच्या प्रकार रहस्यमयरित्या देगलूर पोलीसांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या मदतीने उघड केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

देगलूर (जिल्हा नांदेड) : जानेवारी रोजी बिलोली तालुक्यातील खतगाव शिवारात अर्धवट जळालेल्या आवस्थेत सापडलेल्या अनोळखी मृत व्यक्तीची ओळख पटली असून मयताच्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने त्याचा खून केल्याच्या प्रकार रहस्यमयरित्या देगलूर पोलीसांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या मदतीने उघड केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बिलोली तालुक्यातील आदमपूर, खतगाव शिवारात (ता. नऊ) जानेवारी रोजीच्या पहाटे एका पेट्रोलपंपाच्या शेजारी अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. ग्रामपंचायतीच्या निवडणुकाचे मतदान तोंडावर आलेले असतांना ही घटना उघडकीस आल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. त्यामुळे तपासाचे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले होते.

रामतिर्थ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक महादेव पुरी यांनी घटनास्थळी केलेल्या पहाणीनंतर या व्यक्तीची हत्या (ता. आठ) जानेवारी किंवा ता. नऊ जानेवारी रोजी झाल्याच्या संशय त्यांना आला होता. त्याला कोठे तरी दुसरीकडे मारले असेल आणि खतगाव शिवारात आणून टाकले असेल असा पोलिसांचा त्यावेळी कयास होता. महादेव पुरी यांनी प्रसार माध्यमातून या अनोळखी मयत व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन जनतेला केले होते. या रस्यमय खूनाचा उलगडा अत्यंत रहस्यमयरित्या पोलिसांनी उघड केला. 

हेही वाचा नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडण्याचा निर्णय; अशोक चव्हाणांचे प्रयत्न यशस्वी

ता. १४ जानेवारी रोजी एक महिला देगलूर पोलिस ठाण्यात आली आणि आपला पती ता. आठ जानेवारीपासून बेपत्ता असल्याची फिर्याद देगलूर पोलिस स्थानकात केली. पोलिस निरिक्षक भगवान धबडगे यांना या महिलेच्या बोलण्यातून संशय आला. यानंतर महिलेला पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारपणे देता आली नाहीत. या घटनेची माहिती पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षकानी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना पुढील तपासासाठी देगलूरला पाठवले. देगलूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासातून या रहस्यमय खुनाचा गुन्हा उघडकीस आला असून यातील मयताची पत्नी व नरंगल येथील प्रियकर आरोपीस अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही रामतिर्थ पोलिसांनी बिलोली न्यायालयासमोर शुक्रवारी (ता. १५) हजर केले असता न्यायाधीश पत्की यांनी चार दिवस पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

संपादन- प्रल्हाद कांबळे  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband's murder committed by wife with the help of boyfriend nanded news