हुश्श....सगरोळीकरांनी सोडला सुटकेचा श्वास- ४१ पैकी २ रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह

अभिजीत महाजन
Thursday, 30 July 2020

सगरोळीत कोरोनाकंप होऊन क्षणातच संपूर्ण सगरोळी थांबली. परंतु त्या अकरा बाधित व्यक्तींच्या संपर्कातील ४१ व्यक्तींच्या अहवालात केवळ २ व्यक्ती संक्रमित असल्याचे समजताच सगरोळीकरांनी वाचलो.... म्हणत सुटकेचा श्वास सोडला आहे.

सगरोळी (ता. बिलोली, जिल्हा नांदेड) : एका ६२ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित व्यक्तीपासून अकरा व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याने, सगरोळीत कोरोनाकंप होऊन क्षणातच संपूर्ण सगरोळी थांबली. परंतु त्या अकरा बाधित व्यक्तींच्या संपर्कातील ४१ व्यक्तींच्या अहवालात केवळ २ व्यक्ती संक्रमित असल्याचे समजताच सगरोळीकरांनी वाचलो.... म्हणत सुटकेचा श्वास सोडला आहे.
  
सगरोळी (ता. बिलोली) येथे एका बाधित व्यक्तीपासून सुरु झालेला हा सिलसिला सगरोळीकरांचा श्वास रोखून धरला होता. त्या बाधित व्यक्तींच्या संपर्कातील १४ व्यक्तींपैकी ११ व्यक्तींना संसर्ग झाल्याचे समजताच प्रशासनाने मंगळवार (ता. २८) पासून चार दिवस  संपूर्ण सगरोळीचे जीवनचक्र बंद केले. गुरुवारी (ता. ३०) रोजी सकाळी आरोग्य विभागाने त्या बाधित अकरा व्यक्तींच्या कुटुंब व संपर्कातील ४१ व्यक्तींच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. ह्या ४१ व्यक्तींचा अहवाल काय येणार याकडे सर्वांचे केवळ लक्षच लागून नव्हते तर अनेक घरामंध्ये नागरिकांनी देव पाण्यात ठेवले होते. कारण काहीना काही कारणाने किंवा अनेक इतर व्यक्तींचा कसा संपर्क झाला ह्याचे गणित मांडण्यात नागरिक व्यस्त होते. थोडक्यात संपर्काची जुळवाजुळव होत असल्याने नागरिक भयभीत होऊन चर्चेला उधान आले होते. त्यामुळे जवळपास २४ तास येथील नागरिक त्या ४१ अहवालाच्या प्रतीक्षेत होते. बुधवार (ता. २९) रोजी रात्री अहवाल समजणे अपेक्षित होते परंतु अहवालाच्या प्रतीक्षेतच त्यारात्री सगरोळीकरांनी डोळे झाकली व गुरुवारची सकाळ मात्र सगरोळीकरांसाठी थोडी दिलासादायक ठरली. कारण त्या ४१ पैकी ३५ अहवाल निगेटिव्ह, ४ अनिर्णीत तर २ अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत.

हेही वाचा - नायगाव : लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध- चौघांच्या विरोधात गुन्हा नोंद

सगरोळी संपूर्ण लॉकडाऊन, रस्त्यावर शुकशुकाट 

मागील चार महिन्यात एकही रुग्ण सगरोळीमध्ये आढळला नसल्याने सगरोळीकर कमालीचे बिनधास्त झाले होते. येथील ग्रामपंचायतीने अनेकवेळा बाजार पूर्णतः बंद तर मर्यादित वेळेत चालू ठेवण्याबाबत अनेकवेळा फतवे काढले होते. काहींनी त्यास प्रतिसाद दिला तर काही लालची व्यापाऱ्यांनी आतून दुकाने बंद करून किंवा रात्री उशिरा दुकाने चालू ठेऊन विक्री सुरु ठेवली होती. मात्र आता परिस्थिती बदलली असून एका पासून चौदा नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याने येथील नागरिकांना चांगलेच शहाणपण आले असल्याचे दिसत आहे. कारण दोन दिवसांपासून संपूर्ण लॉकडाऊन केले असल्याने संपूर्ण बाजारपेठ बंद असून रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. 

संपादन-  प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hushh .... Sagarolikars breathed a sigh of relief - 2 out of 41 patients corona positive nanded news