गणेशोत्सव काळात कायदा हातात घ्याल तर खबरदार- विजयकुमार मगर 

प्रल्हाद कांबळे
Saturday, 22 August 2020

काही समाजकंटक अनुचित प्रकार घडविण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

नांदेड : शहर व जिल्ह्यात श्रीगणेशाची शनिवार (ता. 22) ऑगस्ट रोजी स्थापना करण्यात येत असून ता. एक सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन उत्साहात करण्यात येणार आहे. यादरम्यान काही समाजकंटक अनुचित प्रकार घडविण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. शांतता बाधित करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड दम पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिला आहे.

गणेश भक्तांच्या घरी दहा दिवस मुक्कामी येणाऱ्या शहर व जिल्ह्यात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात ‘श्री’ चे आगमन झाले आहे. ता. एक सप्टेंबर रोजी श्री चे विसर्जन शहरातील विविध पवित्र गोदावरी, आसना नदीच्या घाटावर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पोलीस ठाणे स्तरावर जाऊन गणेश उत्सव आणि मोहरम सणाच्या निमित्ताने शांतता समितीच्या बैठका घेऊन तेथील शांतता समिती सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी यांना चालू वर्षी कोरोनाच्या अनुषंगाने आतापर्यंत कोणतीही जयंती व सण उत्सव साजरी करण्यात आले नाहीत. परंतु गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) यांनी जुलै २०२० रोजी मार्गदर्शक सूचना दिल्या त्या सूचनांचा आदर करत गणेशोत्सव व मोहरम साजरा करण्याबाबत आदेश दिले आहेत.

हेही वाचा नांदेडात दुचाकीस्वार चोरट्यांचा हैदोस : लगातार दोन दिवसात तीन लुटमारीच्या घटना

२८६२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

गणेशोत्सव व मोहरम संबंधाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार तसेच गुंड प्रवृत्तीचे लोकांविरुद्ध व मागील गणेशोत्सव संबंधाने दाखल गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध कडक कारवाई करणय्त आली आहे. त्यात सीआरपीसी कलम १०७ प्रमाणे १९०४ जणांवर कारवाई, कलम १०९ प्रमाणे २३ व कलम ११० प्रमाणे ११९ कारवाई केली. तसेच कलम १४९ प्रमाणे ७५० कलम ९३ प्रमाणे ६६ अशा एकूण २८६२ व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.

अंदाजे ९०० संभाव्य गणेश मंडळ स्थापन होण्याची शक्यता

यावर्षी श्री गणेशोत्सव अनुषंगाने आज पावेतो ३६६ अर्ज गणेश मंडळाचे परवानासाठी प्राप्त झाले आहे असून अंदाजे ९०० संभाव्य गणेश मंडळ स्थापन होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या काळात चौख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या उत्साहाच्या वातावरणात कोणी कायदा हातात घेऊन शहराच्या शांततेला बाधा पोहचण्याचा प्रयत्न केला तर त्याची गय केली जाणार नाही. साध्या गणवेशात पोलिस कर्मचारी गस्त घालणार असून संशयित वस्तुला किंवा संशियतांच्या हालचालीवर लक्ष ठेवून पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहनही श्री. मगर  यांनी केली आहे. 

येथे क्लिक कराVideo - संगीत शब्द ऐकल्याने मन का होते उल्हासित, वाचाच तुम्ही

असा राहील पोलिस बंदोबस्त

पोलीस अधीक्षक एक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दोन, उपविभागीय पोलिस अधिकारी ११, पोलीस निरीक्षक ४१, सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक १४६, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी तीन हजार ३००, दंगा नियंत्रण पथकाच्या पाच प्लाटून, राज्य राखीव पोलिस बलाची एक कंपनी, पुरुष होमगार्ड २१६ महिला होमगार्ड ८४ यांच्यासह अतिरिक्त पोलीस फौजफाटा लावण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you take the law into your own hands during Ganeshotsav, be careful Vijaykumar Magar nanded news